खूप कठीण काळात BCCIचा अध्यक्ष झालोय – सौरव गांगुली

खूप कठीण काळात BCCIचा अध्यक्ष झालोय – सौरव गांगुली

सौरव गांगुली

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि क्रिकेट विश्वात बेंगॉल टायगर म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली अखेर बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष म्हणून निवडून आला आणि त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. ज्या सौरव गांगुलीला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला, तोच सौरव गांगुली आज बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्याच्या प्रतिक्रिया देखील चाहत्यांकडून व्यक्त होऊ लागल्या. मात्र, ‘बीसीसीआयच्या अतिशय कठीण काळामध्ये मी अध्यक्षपद स्वीकारत आहे’, अशी प्रतिक्रिया सौरवने दिली आहे. ‘गेल्या तीन वर्षांमध्ये बीसीसीआयची प्रतिमा फारशी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे काहीतरी चांगलं करण्याची ही फार नामी संधी मला आहे’, असं गांगुली यावेळी म्हणाला आहे.

‘प्रथम श्रेणी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार’

दरम्यान, यावेळी गांगुलीने आपण सर्वात आधी प्रथम श्रेणी क्रिकेट आणि त्या खेळाडूंच्या आर्थिक स्थितीवर काम करणार असल्याचं सांगितलं. ‘माझं पहिलं ध्येय हे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असणार आहे. त्यांच्यासंदर्भात मी कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनला गेल्या ३ वर्षांपासून विनंती करत होतो. पण त्यांनी ते मनावर घेतलं नाही’, असं सौरव म्हणाला.


हेही वाचा – #MeToo in BCCI: सौरव गांगुलीने बीसीसीआयला झापले!

‘बिनविरोध निवडून येणं ही मोठी जबाबदारी’

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, ‘बिनविरोध निवड ही एक मोठी जबाबदारी आहे. जरी ही निवड फक्त ९ महिन्यांसाठीच असली, तरी आपल्या परीने बीसीसीआयची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, असं देखील सौरभ गांगुली यावेळी म्हणाला. दरम्यान, अमित शहांसोबत झालेल्या भेटीसंदर्भात बोलताना सौरव म्हणाला, ‘मी भाजपचा प्रचार करणार नाही, अमित शहांसोबत झालेल्या भेटीमध्ये तसं काहीही ठरलेलं नाही.’

First Published on: October 14, 2019 4:57 PM
Exit mobile version