टी-२० मध्येही विंडीजला ‘व्हाईटवॉश’

टी-२० मध्येही विंडीजला ‘व्हाईटवॉश’

शिखर धवन आणि रिषभ पंत (सौ-Cricinfo)

शिखर धवन आणि रिषभ पंत यांच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे भारताने ही ३ सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकत विंडीजला व्हाईटवॉश दिला. भारताने कसोटी मालिकेतही विंडीजला व्हाईटवॉश दिला होता.

पुरनचे आक्रमक अर्धशतक

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचे सलामीवीर शाई होप आणि शिमरॉन हेथमायर या दोघांनी डावाची चांगली सुरुवात केली. त्यांनी ६ षटकांत अर्धशतक फलकावर लावले. यानंतर होपला २४ धावांवर चहलने बाद केले. तर त्यानेच हेथमायरला २६ धावांवर बाद केले. दिनेश रामदिनही १५ धावा करून बाद झाला. पण यानंतर अनुभवी डॅरेन ब्रावो आणि युवा निकोलस पुरन यांनी चांगली भागीदारी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. ब्रावोने ३७ चेंडूंत नाबाद ४३ धावा केल्या. तर पुरनने अधिक आक्रमक फलंदाजी केली. त्याने अवघ्या २५ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ५३ धावा केल्या. या दोघांमुळे विंडीजने भारताला १८२ धावांचे आव्हान दिले.

धवन, पंतची फटकेबाजी 

याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा फक्त ४ धावांवर बाद झाला. पण शिखर धवन आणि लोकेश राहुलने चांगली फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. १७ धावांवर राहुल बाद झाला. यानंतर शिखर आणि रिषभ पंत यांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. पंतने ३८ चेंडूंत ५८ धावा केल्या. तर धवनने ६२ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या. भारताला २ चेंडूंत एका धावेची गरज असताना धवन बाद झाला. पण मनीष पांडेने अखेरच्या चेंडूवर १ धाव करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
First Published on: November 12, 2018 3:37 PM
Exit mobile version