T20 World Cup : सलामीसाठी रोहित-धवनच; ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मत 

T20 World Cup : सलामीसाठी रोहित-धवनच; ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मत 

शिखर धवन आणि रोहित शर्मा

भारतीय संघाने नुकतीच झालेली इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ३-२ अशी जिंकली. मात्र, भारताचा सलामीवीर लोकेश राहुल या मालिकेत अपयशी ठरला. त्याने या मालिकेच्या चार सामन्यांत मिळून केवळ १५ धावा केल्या. त्यामुळे यावर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माच्या साथीने भारताच्या डावाची सुरुवात कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इंग्लंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात रोहितच्या साथीने कर्णधार विराट कोहली सलामीला आला. या दोघांनी ९४ धावांची सलामी दिली. मात्र, सलामीवीर म्हणून कोहलीने चांगली कामगिरी केली असली तरी टी-२० विश्वचषकात रोहितच्या साथीने शिखर धवनने सलामीला आले पाहिजे, असे मत भारताच्या निवड समितीचा माजी सदस्य आणि माजी क्रिकेटपटू शरणदीप सिंगने व्यक्त केले.

संघातून वगळण्यात आल्याचे आश्चर्य

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत धवनला केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आल्याचे मला आश्चर्य वाटले. त्याने आयपीएलच्या मागील मोसमात दमदार कामगिरी केली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियातील टी-२० मालिकेतही त्याने धावा केल्या होत्या. त्याला जेव्हा खेळण्याची संधी मिळते, तेव्हा तो धावा करतो. तो मानसिकदृष्ट्या कणखर आहे. माझ्या मते, टी-२० विश्वचषकात सलामीसाठी रोहित-धवन हाच सलामीचा सर्वोत्तम पर्याय आहे, असे शरणदीप म्हणाला.

कुलदीप-चहलला एकत्र खेळवा

युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या भारताच्या फिरकीपटूंना मागील काही काळात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. भारतीय संघात बरीच स्पर्धा असली तरी या दोघांना एकत्र खेळण्याची संधी दिली पाहिजे, असे शरणदीपला वाटते. कुलदीप आणि चहल हे चांगले फिरकीपटू आहे. रविंद्र जाडेजाचे भारतीय संघात पुनरागमन झाल्यावर जाडेजा, कुलदीप आणि चहल हे भारताचे सर्वोत्तम त्रिकुट आहे. भारतीय संघात फिरकीपटूंच्या स्थानासाठी बरीच स्पर्धा आहे. मात्र, कुलदीप आणि चहलला एकत्र खेळवणे हा भारतासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे शरणदीपने सांगितले.

First Published on: March 30, 2021 6:41 PM
Exit mobile version