नेमबाज अभिनव बिंद्रा ‘ब्ल्यू क्रॉस’ पुरस्काराने सन्मानित

नेमबाज अभिनव बिंद्रा ‘ब्ल्यू क्रॉस’ पुरस्काराने सन्मानित

नेमबाज अभिनव बिंद्रा (सौजन्य-इंडिया टुडे)

भारताचा माजी नेमबाजपटू आणि बिजींग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या ३६ वर्षीय नेमबाजपटूला ISSF (आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटना) कडून ‘ब्ल्यू क्रॉस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार पटकावणारा अभिनव बिंद्रा हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. शुक्रवार, ३० नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

अनेक पुरस्काराने सन्मानित खेळाडू 

नेमबाजी क्षेत्रात ‘ब्लू क्रॉस’ हा सर्वोच्च पुरस्कार ओळखला जातो. हा पुरस्कार मिळवणारा अभिनव बिंद्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नेमबाजी क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल अभिनवला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल अभिनवनेही आतापर्यंत आपल्या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. बिजींग ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकासह, अभिनव बिंद्राने २००६ साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सुवर्णपदकही पटकावलं होतं. याशिवाय ७ राष्ट्रकुल खेळांची पदकं आणि ३ आशियाई खेळांची पदकंही अभिनवच्या नावावर आहेत. त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्याचा खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि पद्मभुषण या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मान केला आहे.

First Published on: November 30, 2018 10:03 PM
Exit mobile version