यशस्विनी देसवालची सुवर्ण कमाई

यशस्विनी देसवालची सुवर्ण कमाई

यशस्विनी देसवाल

भारताची २२ वर्षीय नेमबाज यशस्विनी सिंह देसवालने विश्वचषक स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. हे सुवर्णपदक पटकावल्यामुळे तिने ऑलिम्पिक कोटाही मिळवला. २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारी यशस्विनी ही भारताची नववी नेमबाज आहे.

नेमबाजी विश्वचषकातील १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत यशस्विनीने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या युक्रेनच्या ओलेना कॉस्तेविचचाही पराभव केला. माजी राष्ट्रीय विजेती असणार्‍या यशस्विनीने अंतिम फेरीत २३६.७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. माजी ऑलिम्पिक आणि जागतिक विजेत्या कॉस्तेविचने २३४.८ गुणांसह रौप्यपदक आणि सर्बियाच्या जॅस्मिना मिलावोनोविचने २१५.७ गुणांसह कांस्यपदक मिळवले. पात्रता फेरीत यशस्विनीने ५८२ गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला.

या स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे तिने ऑलिम्पिक कोटा मिळवला. याआधी संजीव राजपूत, अंजुम मुद्गिल, अपूर्वी चंडेला, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, दिव्यांश सिंह पन्वर, राही सरनोबत आणि मनू भाकर यांनी ऑलिम्पिकमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे.

First Published on: September 2, 2019 5:52 AM
Exit mobile version