विश्वचषकात स्मिथ, वॉर्नर छाप पडणारच!

विश्वचषकात स्मिथ, वॉर्नर छाप पडणारच!

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि सलामीवीर डेविड वॉर्नर हे आगामी क्रिकेट विश्वचषकात आपली छाप पडणारच, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक डॅरेन लिहमन यांनी व्यक्त केले आहे. मागील वर्षी द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे स्मिथ आणि वॉर्नर या दोघांवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणामुळेच लिहमन यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. स्मिथ आणि वॉर्नर या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला चांगली कामगिरी करता न आल्याने त्यांच्या बंदीचा कालावधी संपताच त्यांची पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली. त्यामुळे ते विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत आणि हे दोघेही या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करतील असे लिहमन यांना वाटते.

स्मिथ हा ऑस्ट्रेलियन संघात तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळेल. या क्रमांकावर तो विश्वचषकात खूप चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे. तो आणि वॉर्नर मागील १२ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत याची बर्‍याच लोकांना चिंता आहे. मात्र, त्यांनी आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली हे आपण सर्वांनीच पाहिले. डेविड वॉर्नर हा असा खेळाडू आहे, जो सलामीला येऊन सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकू शकतो. तो या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करेल असे मला वाटते. त्याने मागील (२०१५) विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाला बरेच सामने जिंकवून दिले होते. जर या विश्वचषकातही तो आणि दुसरा सलामीवीर अ‍ॅरॉन फिंच चांगली कामगिरी करू शकला, तर ऑस्ट्रेलियन संघाला रोखणे कोणालाही अवघड जाईल, असे लिहमन म्हणाले.

वॉर्नरच्या अनुपस्थितीत फिंचसोबत उस्मान ख्वाजाने सलामीला येत मागील काही सामन्यांत चांगले प्रदर्शन केले होते. मात्र, लिहमन यांच्या मते फिंच आणि वॉर्नर यांनीच सलामीला आले पाहिजे. ते म्हणाले, फिंच आणि वॉर्नरनेच सलामी करावी असे मला वाटते. त्यानंतर ख्वाजा किंवा शॉन मार्श यांनी तिसर्‍या क्रमांकावर आणि स्मिथने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी.

First Published on: May 15, 2019 4:55 AM
Exit mobile version