गांगुलीने सुरुवात केली, कोहलीने टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेले!

गांगुलीने सुरुवात केली, कोहलीने टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेले!

सौरव गांगुलीने कर्णधार असताना भारतीय क्रिकेट संघाचे रुपडे पालटण्यास सुरुवात केली, तर निडर विराट कोहलीने भारताला वेगळ्या उंचीवर नेले, असे मत इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि आताचे प्रसिद्ध समालोचक डेविड लॉईड यांनी व्यक्त केले. गांगुलीबाबत बोलताना लॉईड यांनी २००० च्या सुरुवातीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांचे उदाहरण दिले. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने भारतात झालेली कसोटी मालिका २-१ अशी जिंकली, तर ऑस्ट्रेलियात जाऊन यजमानांना १-१ असे बरोबरीत रोखले.

गांगुली कर्णधार झाल्यावर चित्र बदलले

मी गांगुलीचा चाहता आहे. गांगुलीने स्वतःचे खेळाडू शोधले आणि त्यांना घडवले. भारतीय संघाला परदेशात अधिक उसळी घेतलेल्या चेंडूविरुद्ध खेळताना अडचण येते असे म्हटले जायचे. मात्र, गांगुली आणि त्याचा संघ ऑस्ट्रेलियात पूर्ण तयारीनिशी गेला. उसळी घेतलेल्या चेंडूचा त्यांनी निडरपणे सामना केला. भारताला भारतात हरवणे सुरुवातीपासूनच अवघड होते. मात्र, परदेशात प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याविरुद्ध जिंकण्याची संधी असायची. गांगुली कर्णधार झाल्यावर हे चित्र बदलले. भारतीय संघाने जगभरात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात गांगुलीची भूमिका महत्त्वाची आहे, असे लॉईड म्हणाले. तसेच त्यांनी आताचा भारतीय कर्णधार कोहलीचे कौतुक केले.

कोहली लढवय्या आणि निडरही

कोहलीने भारतीय संघाला वेगळ्या उंचीवर नेले आहे. कोहली किती उत्कृष्ट खेळाडू आहे हे आपल्याला माहितीच आहे, पण तो तितकाच चांगला कर्णधारही आहे. तो लढवय्या आणि निडरही आहे. कर्णधाराने निडर असणे खूप महत्त्वाचे असते. कोहली स्वतःच्या कामगिरीचा, विक्रमांचा फारसा विचार करत नाही. त्याला संघाला जिंकवायचे असते. ‘मी सर्वोत्तम खेळाडू आहे आणि मला दमदार कामगिरी करून इतर खेळाडूंसमोर आदर्श ठेवायचा आहे,’ असा कोहली विचार करतो. हीच गोष्ट त्याला खास बनवते, असे लॉईड यांनी नमूद केले.

First Published on: July 24, 2020 1:00 AM
Exit mobile version