कोहली नाही, स्मिथ सर्वोत्तम

कोहली नाही, स्मिथ सर्वोत्तम

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ यांच्यातील सर्वोत्तम फलंदाज कोण याबाबत सतत चर्चा होत असते. स्मिथची कसोटीतील कामगिरी फारच उत्कृष्ट आहे. मात्र, कोहली क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्यातच एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे बरेच क्रिकेट समीक्षक सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून कोहलीला पसंती देतात. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्याशी सहमत नाही. त्याच्या मते, स्मिथ सध्या कोहलीपेक्षा सरस आहे.

सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून मी कोहली नाही, तर स्मिथची निवड करेन. स्मिथला मागील काही काळात बर्‍याच आव्हानांना सामोरे जावे लागले आहे, पण त्यातून तो बाहेरही पडला आहे. खासकरून मागील एका वर्षात तो ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, ते फारच वाखाणण्याजोगे आहे. तो खूप जिद्दी आहे. तो ज्या पद्धतीने खेळतो, ते पाहून कधीतरी आपल्याला थकवा जाणवतो. कोहलीही उत्कृष्ट खेळाडू आहे. या दोघांमध्ये एकाची निवड करणे फारच अवघड आहे. उद्या मी कदाचित कोहलीला निवडेन. मात्र, आज मला कोहलीपेक्षा स्मिथ सरस वाटतो, असे ली म्हणाला.

२०१८ मध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. परंतु, त्याने मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक आणि अ‍ॅशेस मालिकेतून दमदार पुनरागमन केले. अ‍ॅशेसच्या ४ सामन्यांत त्याने ३ शतके आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने तब्बल ७७४ धावा चोपून काढल्या होत्या. त्यामुळे केवळ आकड्यांचा विचार करता स्मिथची महान डॉन ब्रॅडमन यांच्याशीही तुलना होऊ शकते, असे ली याला वाटते.

First Published on: May 27, 2020 4:30 AM
Exit mobile version