शंकरच्या क्षमतेबाबत अजूनही प्रश्नचिन्ह

शंकरच्या क्षमतेबाबत अजूनही प्रश्नचिन्ह

केविन पीटरसन

मागील सोमवारी ३० मेपासून सुरू होणार्‍या विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाली. या संघात फलंदाज अंबाती रायडूचा समावेश करण्यात आला नाही. त्याच्याऐवजी अष्टपैलू विजय शंकरला या संघात स्थान मिळाले. तो या संघात चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पहिला पर्याय असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के प्रसाद संघाची घोषणा करताना म्हणाले. मात्र, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला विजय शंकरने तितकेसे प्रभावित केलेले नाही. शंकर चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करू शकेल याबाबत तो साशंक आहे.

शंकरचा खेळ मी पाहिला आहे आणि तो भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करू शकेल याबाबत मी साशंक आहे. भारतासाठी काही महान खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर खेळताना मी पाहिले आहे आणि त्या खेळाडूंच्या तुलनेत शंकर खूपच मागे पडतो. चौथ्या क्रमांकावर खेळणे अवघड असते, त्यातही इंग्लंडच्या वातावरणात तर ते अधिकच अवघड होते. खरे सांगायचे तर मला असे वाटते की शंकर आणि केदार जाधव यांची निवड फक्त ते गोलंदाजी करू शकतात म्हणून झाली आहे, असे पीटरसन म्हणाला.

शंकरने आतापर्यंत भारतासाठी ९ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३३ च्या सरासरीने १६५ धावा तर २ विकेट घेतल्या आहेत. त्याला फारशा विकेट मिळाल्या नसल्या तरी त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

शंकर संघात असल्याचा आनंद – कोहली

विजय शंकर हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे. तो या संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू असू शकेल आणि त्यामुळे तो संघात असल्याचा मला आनंद आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहली विजय शंकरच्या विश्वचषकासाठीच्या निवडीबाबत म्हणाला. भारताने विश्वचषकासाठी शंकरसोबतच हार्दिक पांड्या आणि डावखुरा रविंद्र जाडेजा या अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे.

First Published on: April 19, 2019 4:05 AM
Exit mobile version