मुलींत मुंबई उपनगर, मुलांत ठाणे अजिंक्य

मुलींत मुंबई उपनगर, मुलांत ठाणे अजिंक्य

मुंबई उपनगरने सलग दुसर्‍यांदा मुलींमध्ये, तर ठाण्याने मुलांमध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने आयोजित ३१ व्या सब-ज्युनियर गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अहमदनगरच्या रेसिडेंशियल हायस्कूल येथील क्रीडांगणावर ही स्पर्धा पार पडली.

सब-ज्युनियर मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने परभणीचा ५७-२७ असा पराभव करत स्व. राजश्री चंदन पांडे चषकावर आपले नाव कोरले. हरजितकौर सिंग, याशिका पुजारी, समृद्धी मोहिते, स्नेहल चिंदरकर यांच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर मुंबई उपनगरने मध्यंतराला ३४-११ अशी आघाडी घेतली. पूर्वार्धात तीन लोण देणार्‍या मुंबई उपनगरच्या संघाने उत्तरार्धात आणखी दोन लोण देत सामना तब्बल ३० गुणांच्या फरकाने जिंकला.

मुलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने पुण्यावर ४२-१९ अशी मात करत स्व. नारायण नागो पाटील चषक पटकावला. ठाण्याला प्रथमच ही स्पर्धा जिंकण्यात यश आले. पुण्याविरुद्धच्या सामन्याची दमदार सुरुवात करत ठाण्याने मध्यंतराला २२-९ अशी आघाडी घेतली. पुढेही त्यांनी चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना सहजपणे जिंकला. प्रिन्सकुमार तिवारी, कौस्तुभ शिंदे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला ठाण्याच्या विजयाचे श्रेय जाते.

First Published on: January 28, 2020 5:22 AM
Exit mobile version