गावस्कर, मांजरेकर थोडक्यात बचावले

गावस्कर, मांजरेकर थोडक्यात बचावले

सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील लखनऊ येथे झालेला दुसरा टी-२० सामना भारताने जिंकला. हा सामना जिंकल्यामुळे त्यांनी मालिकेत २-० ची विजयी आघाडी मिळवली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने फटकेबाजी करत शतक झळकावले. त्याच्या या शतकात ७ षटकारांचा समावेश होता. त्यापैकी एक षटकार त्याने इतका उंच आणि दूर मारला की तो थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दरवाजाला जाऊन लागला आणि त्याची काच फुटली.

दरवाजाची काच पात्यांच्या बंगल्यासारखी कोसळली

कॉमेंट्री बॉक्सच्या दरवाजाची काच फुटली त्यावेळी सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर हे दोघे कॉमेंट्री बॉक्सच्या आत शिरत होते. पण सुदैवाने त्यांना ही काच लागली नाही आणि कुठलीही दुखापत झाली नाही. या क्षणाविषयी संजय मांजरेकर म्हणाले, “आम्ही आत जाणार तितक्यातच एका दरवाजाची काच पात्यांच्या बंगल्यासारखी खाली कोसळली. सुदैवाने आम्हाला कोणतीही दुखापत झाली नाही.”

या स्टेडिअमवरील पहिला आंतरराष्ट्रीय सामना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-२० सामना हा लखनऊच्या भारतरत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअममध्ये होणारा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. ५० हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडिअमचे सामना सुरू होण्याच्या एका रात्री आधीच योगी सरकारने इकाना स्टेडियम हे नाव बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे नाव दिले. त्यामुळे या स्टेडियमला ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम’ असे नाव पडले आहे.

First Published on: November 7, 2018 5:52 PM
Exit mobile version