राशिदचा बोलबाला, कोलकाता को हरा डाला!

राशिदचा बोलबाला, कोलकाता को हरा डाला!

अष्टपैलू खेळाडू रशिद खान

कोलकाता – आयपीएल २०१८ च्या अंतिम सामन्यात अखेर हैदराबाद संघाने धडक मारली आहे. प्ले ऑफमध्ये आल्यानंतर अंतिम सामन्यात येण्यासाठी हैदराबादला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. पहिली लढत चेन्नई सुपरकिंग्जसोबत हरल्यानंतर काल कोलकाता विरोधात झालेल्या दुसऱ्या सामन्यात हैदराबादने बाजी मारली. इडन गार्डन्सवरच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने कोलकात्यावर १३ धावांनी मात केली. या सामन्यात हैदराबादने कोलकात्याला विजयासाठी १७५ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने २० षटकांत ९ बाद १६१ धावांची मजल मारली. या विजयासह हैदराबादच्या संघाने दुसऱ्यांदा आयपीएलच्या किताबावर नाव कोरण्याचा दावा मजबूत केला.

सनरायझर्स हैदराबाद संघ

रशिद खान ठरला ‘हिरो ‘
हैदराबादने २० षटकांत सात बाद १७४ धावांची मजल मारली होती. खरं तर हैदराबादला १८ षटकांत सात बाद १३८ धावाच करता आल्या. पण रशिद खानने १० चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ३४ धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादच्या खात्यात अखेरच्या दोन षटकांत ३६ धावांची भर पडली. त्याआधी, रिद्धिमान साहाने ३५, शिखर धवनने ३४, शकिब अल हसनने २८ आणि दीपक हूडाने १९ धावांची खेळी केली. गोलंदाजीतही रशिद कोलकात्यावर भारी पडला. रशिदने ४ षटकांत १९ धावा देऊन ३ विकेट घेतल्या. शिवाय सिद्धार्थ कौलने दोन, तर कार्लोस ब्रेथवेटने अखेरच्या षटकात दोन विकेट घेऊन हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने एक विकेट घेतली.

हैदराबाद चेन्नईसोबत भिडणार

हैदराबाद पुन्हा चेन्नईसोबत भिडणार
आयपीएलचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी मुंबईतील वानखेडेवर होणाऱ्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज आणि केन विलियम्सची सनरायझर्स हैदराबाद आमने – सामने असणार आहेत. आयपीएल २०१८ ची ट्रॉफी कोणाच्या हातात असेल? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. क्वालिफायर वन सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने हैदराबादवर मात करुन, फायनलचं तिकीट मिळवलं होतं.

First Published on: May 26, 2018 5:13 AM
Exit mobile version