MS Dhoni : ‘निवृत्ती जाहीर केल्यानंतर मी आणि धोनी खूप रडलो’, सुरेश रैनाची पहिली प्रतिक्रिया!

MS Dhoni : ‘निवृत्ती जाहीर केल्यानंतर मी आणि धोनी खूप रडलो’, सुरेश रैनाची पहिली प्रतिक्रिया!

भारताचा Captain Cool महेंद्र सिंह धोनीनं दोन दिवसांपूर्वी १५ ऑगस्टचा मुहूर्त साधत निवृत्ती जाहीर केली आणि भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का बसला. त्यापाठोपाठ अर्ध्या तासातच डावखुरा बॅट्समन सुरेश रैनाने देखील निवृत्ती जाहीर केली. या दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्तीसाठी फक्त २ ओळींचा संदेश टाकला होता. त्यामुळे त्या दोघांच्याही फॅन्सना चुटपुट लागून राहिली होती. अखेर सुरेश रैनाने निवृत्तीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवृत्ती जाहीर केल्यानंतर मी आणि महेंद्र सिंह धोनी एकमेकांना मिठी मारून खूप रडलो’, असं सुरेश रैना म्हणाला आहे. धोनीच्या निवृत्तीबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. IPLमध्ये खेळल्यानंतर टी-२० वर्ल्डकपमध्ये धोनी खेळणार किंवा नाही, याविषयी चित्र स्पष्ट होणार होतं. मात्र, Corona मुळे आयपीएल आणि त्यामुळे T-20 वर्ल्डकप देखील पुढे ढकलला गेल्यामुळे धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अखेर त्यांनं निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकट्रॅकरने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

काय म्हणाला रैना?

सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी हे दोघेही सध्या चेन्नईमध्ये असून आयपीएलच्या सामन्यांसाठी त्यांचा सराव सुरू झाला आहे. त्यावर रैना म्हणतो, ‘आम्ही चेन्नईला पोहोचल्यानंतर धोनी निवृत्ती जाहीर करणार हे मला आधीच ठाऊक होतं. त्यामुळे मी तयारच होतो. मी, पियुष चावला, दीपक चहर आणि कर्ण शर्मा आणि चौघे १४ तारखेला रांचीला पोहोचलो आणि धोनीला घेऊन चेन्नईला दाखल झालो. इन्स्टाग्रामवर निवृत्ती जाहीर केल्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि खूप रडलो. मी, पियुष चावला, अंबाती रायडु, केदार जाधव आणि कर्ण शर्मा असे आम्ही सगळे त्यानंतर बसलो आणि आमच्या करिअरविषयी बोललो. नंतर रात्री आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेलो.’

‘धोनीला भारतरत्न द्या’

मध्य प्रदेशच्या भोपालमधले काँग्रेस आमदार पी. सी. शर्मा यांनी महेंद्र सिंह धोनीला भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. ‘भारतीय क्रिकेटला पूर्ण जगात विजेत्याच्या रुपात प्रस्थापित करणारा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला भारत रत्न द्यायला हवा’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

First Published on: August 17, 2020 5:05 PM
Exit mobile version