सुरेश रैनाचा विक्रम

सुरेश रैनाचा विक्रम

टी-२० मध्ये ८००० धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय

भारताचा फलंदाज सुरेश रैनाच्या उत्तर प्रदेशने सोमवारी सय्यद मुश्ताक अली करंडकात पुडुचेरीचा ७७ धावांनी पराभव केला. हा रैनाचा टी-२० क्रिकेटमधील ३०० वा सामना होता. ३०० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा रैना हा महेंद्रसिंग धोनीनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याने या सामन्यात १८ चेंडूंत १२ धावाच केल्या. मात्र, या खेळीदरम्यान त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.

३२ वर्षीय रैना टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली (७८३३ धावा) या यादीत सातव्या स्थानी आहे. या यादीत पहिल्या स्थानी वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज क्रिस गेल आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३६९ सामन्यांत १२२९८ धावा केल्या आहेत. ज्यात २१ शतकांचाही समावेश आहे, तसेच रैना हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये १७६ सामन्यांत ४९८५ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.

रैनाने यंदाच्या मुश्ताक अली करंडकात हैद्राबादविरुद्ध नाबाद ५४ धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन सामन्यांत त्याला १ आणि १२ धावाच करता आल्या आहेत. मागील काही काळात रैनाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले आहे.

First Published on: February 26, 2019 4:38 AM
Exit mobile version