सौरभ वर्माला जेतेपदाची हुलकावणी

सौरभ वर्माला जेतेपदाची हुलकावणी

सौरभ वर्मा

भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माला सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेची अंतिम फेरी जिंकण्यात अपयश आले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याचा चिनी तैपईच्या वांग झू वेईने १५-२१, १७-२१ असा सरळ गेममध्ये पराभव केला. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे सलग चार वेळा भारतीय बॅडमिंटनपटूने जेतेपद पटकावले होते. २०१५ मध्ये पारुपल्ली कश्यप, २०१६ मध्ये किदाम्बी श्रीकांत, तर २०१७ आणि २०१८ मध्ये समीर वर्माने ही स्पर्धा जिंकली होती. यंदा मात्र सौरभचा पराभव करत वांगने भारतीयांची जेतेपदाची ही मालिका खंडित केली.

४९ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. त्यामुळे पहिल्या गेमच्या मध्यंतराला वांगकडे ११-१० अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. मात्र, यानंतर वांगने अधिक आक्रमक खेळ करत पुढील ८पैकी ६ गुण जिंकले आणि या गेममध्ये १७-१२ अशी आघाडी घेतली. पुढेही त्याने दमदार खेळ सुरू ठेवत पहिला गेम २१-१५ असा जिंकला.

दुसर्‍या गेमच्या सुरुवातीलाच वांगने ५-० अशी आघाडी घेत सौरभवर दबाव टाकला, परंतु चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे सौरभच्या खेळात सुधारणा झाली. या गेमच्या मध्यंतराला तो ८-११ असा केवळ तीन गुणांनी पिछाडीवर होता. यानंतर त्याने १४-१४ अशी बरोबरीही केली. मात्र, १६-१६ अशी बरोबरी असताना वांगने ६ पैकी ५ गुण मिळवले. त्यामुळे वांगने दुसरा गेम २१-१७ असा आपल्या खिशात टाकत या स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

First Published on: December 2, 2019 5:25 AM
Exit mobile version