फलंदाजांची चिंता नाही!

फलंदाजांची चिंता नाही!

रोहित

भारताच्या फलंदाजांना बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. या सामन्यात भारताने केवळ १४८ धावा केल्या. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणार्‍या भारताला टी-२० क्रिकेटमध्ये मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. या काळात भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केले आहे. सलामीवीर शिखर धवनला डावाच्या सुरुवातीला वेगाने धावा करण्यात वारंवार अपयश येत आहे. लोकेश राहुल, रिषभ पंत यांच्या खेळातही सातत्याचा अभाव आहे. मात्र, असे असतानाही आम्हाला फलंदाजांची चिंता नाही, असे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

आमची फलंदाजी चांगली होत आहे. त्यामुळे आम्हाला फलंदाजांची चिंता नाही. आम्हाला फलंदाजांच्या फळीत बदल करण्याची अजिबातच गरज नाही. मात्र, आम्ही खेळपट्टीचा पाहणी करू आणि त्यानंतरच अंतिम संघाबाबत निर्णय घेऊ, असे रोहित म्हणाला. तसेच गोलंदाजांबाबत रोहितने सांगितले, दिल्लीत झालेल्या मागील सामन्यातील खेळपट्टी लक्षात घेऊन आम्ही वेगवान गोलंदाजांची निवड केली. आम्ही या सामन्याची खेळपट्टी कशी आहे ते पाहू आणि त्यानुसार वेगवान गोलंदाज खेळवू.

भारताने पहिल्या टी-२० सामन्यात क्षेत्ररक्षण आणि डीआयएसच्या वापरात काही चुका केल्या. या चुका पुन्हा होणार नाहीत, याची खेळाडूंनी काळजी घेतली पाहिजे, असे रोहितला वाटते. आम्ही बर्‍याच क्षेत्रांमध्ये चुका केल्या. या चुकांवर लक्ष केंद्रित करणे आणि या चुका पुन्हा होणार नाहीत, याची खेळाडूंनी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वोत्तम संघ त्याच-त्याच चुका करत नाहीत, असे रोहितने सांगितले.

टी-२० मध्ये युवकांना संधी देणे योग्यच!

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेआधी भारतीय संघ युवा खेळाडूंना जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. युवा खेळाडूंना एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटआधी टी-२० मध्ये संधी देणे योग्यच आहे, असे विधान रोहित शर्माने केले. आमचे बरेच प्रमुख खेळाडू टी-२० मध्ये सध्या खेळत नाहीत. तसेच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमचे सर्वच खेळाडू उपलब्ध असतात. त्यामुळे आम्ही टी-२० क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. ते या प्रकारात आपला नैसर्गिक खेळ करू शकतात आणि एकदिवसीय, टी-२० क्रिकेटसाठी तयार होऊ शकतात, असे रोहित म्हणाला.

First Published on: November 7, 2019 5:23 AM
Exit mobile version