रणजी करंडक जिंकणे प्रमुख ध्येय – मुंबई प्रशिक्षक सामंत

रणजी करंडक जिंकणे प्रमुख ध्येय – मुंबई प्रशिक्षक सामंत

मुंबई प्रशिक्षक सामंत

मुंबईच्या संघाला मागील मोसमाच्या रणजी करंडकात चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले. मागील मोसमात प्रशिक्षक विनायक सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने बर्‍याच वर्षांनंतर विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा जिंकली. मात्र, रणजी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईची कामगिरी निराशजनक होती. त्यामुळे सामंत यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले होते. पण सुलक्षण कुलकर्णी यांनी प्रशिक्षक होण्यास नकार दिल्यामुळे सामंत यांची प्रशिक्षकपदी फेरनिवड झाली. आता मिळालेल्या या संधीचा सामंत यांना चांगला उपयोग करायचा आहे. या मोसमात खासकरून रणजी करंडकात कामगिरी सुधारण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

आम्ही मागील मोसमात ज्या चुका केल्या, त्या सुधारण्यावर माझा भर आहे. आमचे यंदाच्या रणजी करंडकात दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, त्यामुळे आम्ही एकदिवसीय आणि टी-२० स्पर्धेकडे दुर्लक्ष करणार नाही. मागील मोसमात आम्ही मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. परंतु, रणजी करंडकात आम्ही निराशाजनक खेळ केला. त्यामुळे यंदा रणजी करंडकातील कामगिरीकडे आम्ही विशेष लक्ष देऊ, असे सामंत म्हणाले.

उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉवर बीसीसीआयने आठ महिन्यांची बंदी घातली. बंदीचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा मुंबईच्या संघात खेळेल. त्याला तुम्ही काय सल्ला द्याल असे विचारले असता सामंत यांनी सांगितले, तुम्ही जर शिस्त पाळली नाहीत, तर तुम्हाला शिक्षा होणारच. त्यामुळे मी त्याला सर्वात आधी शिस्त पाळण्याचा सल्ला देईन. तो चांगला मुलगा आहे. मला आशा आहे की, तो त्याचा खेळाबाबतचा दृष्टीकोन बदलेल. तसे झाल्यास त्याला मुंबई आणि भारतासाठी चांगली कामगिरी करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.

First Published on: August 29, 2019 6:19 AM
Exit mobile version