हॉकी प्रो लीगचा दुसरा मोसम जून २०२१ पर्यंत!

हॉकी प्रो लीगचा दुसरा मोसम जून २०२१ पर्यंत!

Hockey

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खेळांच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. आता एफआयएच हॉकी प्रो लीगच्या दुसर्‍या मोसमाचा कालावधीही एका वर्षाने म्हणजेच जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे. हॉकी प्रो लीगचा दुसरा मोसम जानेवारी ते जून २०२० या कालावधीत पार पडणार होता. परंतु, सहभागी झालेल्या ११ राष्ट्रीय असोसिएशन्सशी चर्चा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (एफआयएच) या स्पर्धेचा कालावधी एका वर्षाने वाढवला.

जानेवारी ते मार्च या कालावधीत ठरल्याप्रमाणे या स्पर्धेचे सामने झाले होते. मात्र, त्यानंतर करोनाच्या धोक्यामुळे जगातील सर्व स्पर्धा बंद करण्यात आल्या आणि यात हॉकी प्रो लीगचाही समावेश होता. आता परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर आणि सुरक्षित असेल, तेव्हाच पुन्हा या स्पर्धेच्या दुसर्‍या मोसमाला सुरुवात होणार असल्याचे एफआयएचने स्पष्ट केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारसी आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे ढकलण्याची घोषणा, हे लक्षात घेऊन हॉकी प्रो लीगचा दुसरा मोसम २०२१ सालच्या मध्यापर्यंत वाढवणे हाच योग्य निर्णय होता. यामुळे आम्हाला ही स्पर्धा पूर्ण करण्याची संधी मिळेल, असे एफआयएचने आपल्या पत्रकात लिहिले.

First Published on: April 25, 2020 5:38 AM
Exit mobile version