अपयशाला न घाबरणे हेच माझ्या यशाचे रहस्य!

अपयशाला न घाबरणे हेच माझ्या यशाचे रहस्य!

मयांक अगरवालचे विधान

अपयशाला न घाबरणे आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करणे, या दोन गोष्टींमुळे मला यश मिळत आहे, असे विधान भारताचा द्विशतकवीर मयांक अगरवालने केले. सलामीवीर मयांकने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ३३० चेंडूत २४३ धावांची खेळी केली. ही त्याच्या ८ सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली. तसेच हे त्याचे कसोटीतील दुसरे द्विशतक होते. त्याने या डावात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासोबत शतकी भागीदारीही केली. त्यामुळे भारताने दुसर्‍या दिवसअखेर ३४३ धावांची आघाडी घेतली आहे.

मानसिकतेत मी आता थोडा बदल केला आहे. अपयशाला न घाबरणे आणि कोणत्याही गोष्टीचा फार विचार न करणे, हा दोन गोष्टी माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरल्या आहेत. या गोष्टींमुळे माझी धावांसाठीची भूक वाढली आहे. काही वेळा मी लवकर बाद झालो आहे. त्यामुळे मी जेव्हा खेळपट्टीवर थोडा वेळ घालवतो, तेव्हा मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करतो, असे मयांक म्हणाला.

भारताने चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्या विकेट्स झटपट गमावल्यानंतर मयांकने चौथ्या विकेटसाठी रहाणेसोबत १९० धावांची भागीदारी केली. या भागीदारीबाबत मयांकने सांगितले, अजिंक्य हा अनुभवी खेळाडू आहे आणि त्याने खूप कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे तो मला सतत मार्गदर्शन करत होता. आम्ही वेळ घेत भागीदारी करण्याचा प्रयत्न करत होतो. या खेळपट्टीवर चेंडू चांगली उसळी घेत होता. त्यामुळे चेंडू फटकावण्यास मजा येत होती. आम्ही या सामन्याबाबत अजून फारशी चर्चा केलेली नाही. मात्र, आम्ही ज्या पद्धतीने खेळत आहोत, ते पाहता आता आमचे पारडे जड आहे असे म्हणायला हरकत नाही. आम्ही बांगलादेशवर अधिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करू.

मयांकने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्याच डावात अर्धशतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी करणे खूप खास होते आणि संघाच्या यशात योगदान देत असल्याचा आनंद आहे, असेही मयांक म्हणाला.

First Published on: November 16, 2019 4:36 AM
Exit mobile version