हॅट्ट्रिक घेतली याची कल्पनाही नव्हती

हॅट्ट्रिक घेतली याची कल्पनाही नव्हती

गोलंदाज सॅम करन

आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा युवा वेगवान गोलंदाज सॅम करनने हॅट्ट्रिक घेतली. त्याने दिल्लीच्या डावातील १७ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हर्षल पटेलला (०) माघारी पाठवले, तर १९ व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर कागिसो रबाडा (०) आणि संदीप लामिच्छाने (०) यांना बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि पंजाबला विजय मिळवून दिला. २० वर्षीय करन हा आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेणारा सर्वात युवा गोलंदाज आहे. मात्र, सामन्यादरम्यान मी हॅट्ट्रिक घेतली याची मला कल्पनाही नव्हती, असे करनने सांगितले.

मी हॅट्ट्रिक घेतली याची मला कल्पनाही नव्हती. आम्ही जेव्हा हा सामना जिंकला, तेव्हा आमच्या संघातील एक खेळाडू माझ्या जवळ येऊन म्हणाला की तू हॅट्ट्रिक घेतली आहे. सामन्यादरम्यान मला याबाबत खरोखरच कल्पना नव्हती. रबाडा जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मला माहीत होते की त्याला कुठे गोलंदाजी करायची. तो फलंदाजी करत असताना यष्टींवर चेंडू टाकण्याचे माझे लक्ष्य होते. तसेच अश्विननेही मला मार्गदर्शन केले. बर्‍याच भारतीय खेळाडूंविरोधात मी खेळलेलो नाही, त्यामुळे त्यांना कशी गोलंदाजी करायची, ते फलंदाज कुठे फटके मारतात याबाबत मी आमच्या संघातील स्थानिक खेळाडूंना विचारात असतो. शमीनेही शेवटी दोन चांगली षटके टाकली, असे सामन्यानंतर करनने सांगितले.

तसेच या सामन्यात क्रिस गेलच्या अनुपस्थितीत करनला सलामीला पाठवण्यात आले. आपल्या फलंदाजीबाबत तो म्हणाला, मागील काही महिन्यांत मी फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. शालेय क्रिकेटमध्ये मी बर्‍याच सामन्यांत सलामीवीर म्हणून खेळलो आहे. मात्र, व्यावसायिक क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळण्याची बहुतेक माझी ही पहिलीच वेळ होती. मला आशा आहे की आम्ही पुढील सामन्यांतही चांगले प्रदर्शन करू आणि सामने जिंकू.

First Published on: April 3, 2019 4:55 AM
Exit mobile version