Video: आजच्याच दिवशी शेन वॉर्नने ९० अंशाच्या कोनात चेंडू फिरवला होता

Video: आजच्याच दिवशी शेन वॉर्नने ९० अंशाच्या कोनात चेंडू फिरवला होता

शेन वॉर्नचा जादूई डिलिव्हरी

जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खास आहे. २७ वर्षांपूर्वी आजच्याच म्हणजे ४ जून रोजी ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज आणि फिरकीचा जादूगार शेन वॉर्न याने ‘बॉल ऑफ सेंच्युरी’ची डिलिव्हरी केली होती. तसे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक गोलंदाजांनी एकापेक्षा एक चेंडू टाकले आहेत. मात्र वॉर्नच्या या चेंडूची डिलिव्हरी विक्रमी ठरण्याचे कारण वेगळेच आहे.

‘बॉल ऑफ सेंच्युरी’चा किस्सा

१९९३ सालच्या ४ जून रोजी ऑस्ट्रिलया विरुद्ध इंग्लंड अॅशेस कसोटी स्पर्धा सुरु होती. शेन वॉर्न आपला पहिलाच अॅशेस कसोटी सामना खेळत होता. मात्र या दिवशी त्याने टाकलेल्या एका चेंडूची इतिहासात नोंद होईल, हा विचार कुणीच केला नव्हता. इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे हा कसोटी सामना खेळला जात होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २८९ धावा केल्या होत्या. इंग्लंडची फलंदाजी आल्यानंतर त्यांनीही चांगली सुरुवात केली. मात्र जेव्हा चेंडू वॉर्नच्या हातात गेला. तेव्हा त्याने चमत्कारच करुन दाखवला.

चेंडू हवेत उसळवून फिरकी घेण्यात वॉर्न चांगलाच पटाईत होता. त्या दिवशी फलंदाज माइक गेटिंगलाही त्याने असाच चेंडू फेकला होता. मात्र वॉर्नच्या बोटांची कला, पिचवरील ओस, चेंडूची एका बाजूची शाइन या सर्वांचा असा काही मिलाप झाला की, चेंडू लेग स्टम्पवर पडून थेट ऑफ स्टम्पवर जाऊन आदळला.

 

या डिलिव्हरी नंतर वॉर्न, गेटिंग, ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मैदानात बसलेले क्रिकेटचे चाहते आश्चर्यचकीत होऊन पाहायला लागले. गोलंदाज तज्ज्ञांनी सांगितले की, वॉर्नने ९० च्या कोनापेक्षाही अधिक कोनात चेंडू फिरवला होता. या चेंडूची चर्चा अनेक दिवस क्रिकेट जगतात रंगली. त्यानंतर काही दिवसांनी या चेंडूला ‘बॉल ऑफ सेंच्युरी’ म्हणून घोषित करण्यात आले.

First Published on: June 4, 2020 4:53 PM
Exit mobile version