हा मोसम आमच्यासाठी फार वाईट नव्हता

हा मोसम आमच्यासाठी फार वाईट नव्हता

Virat Kohli

विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यंदाच्या आयपीएल मोसमात प्ले-ऑफ गाठता आले नाही. त्यांना १४ पैकी केवळ ५ सामनेच जिंकता आले. मात्र, असे असतानाही कोहली संघाच्या कामगिरीबाबत समाधानी आहे. या स्पर्धेच्या उत्तरार्धात बंगळुरूने ज्याप्रकारे प्रदर्शन केले, त्यामुळे आमच्यासाठी हा मोसम फार वाईट नव्हता, असे कोहली म्हणाला. बंगळुरूने या स्पर्धेची सुरुवात ६ पराभवांनी केली होती. मात्र, त्यानंतर ८ पैकी ५ सामने जिंकण्यात त्यांना यश आले.

आमच्या संघाने या स्पर्धेच्या उत्तरार्धात खूप चांगले प्रदर्शन केले. आम्हाला पूर्वार्धातही अशीच कामगिरी करायची होती. पहिले ६ सामने गमावल्यानंतर आयपीएलसारख्या स्पर्धेत पुनरागमन करणे फार अवघड असते. मात्र, आम्ही उत्तरार्धात जी कामगिरी केली, त्यामुळे हा मोसम आमच्यासाठी फार वाईट होता असे वाटत नाही. आम्ही अखेरच्या ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले, तर एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. ही कामगिरी आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, असे कोहली म्हणाला.

तसेच प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले असले तरी या मोसमातून खूप काही शिकायला मिळाले, असे कोहलीचे मत आहे. तो म्हणाला, उत्तरार्धात आम्ही ज्याप्रकारे या स्पर्धेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या खेळाडूंनी ज्याप्रकारे त्यांचा खेळ उंचावला ते कौतुकास्पद आहे. आमच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय संघ व्यवस्थापनाला जाते.

First Published on: May 6, 2019 5:05 AM
Exit mobile version