यंदा आशिया चषक होणारच!

यंदा आशिया चषक होणारच!

Asia Cup

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा यंदा ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही स्पर्धा श्रीलंका किंवा युएईमध्ये आयोजित केली जाईल असेही त्यांनी सांगितले. करोनाच्या पाश्वर्र्भूमीवर जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. परंतु, आयपीएल स्पर्धा व्हावी यासाठी आशिया चषक स्पर्धा रद्द केली जाऊ शकेल अशी चर्चा सुरु होती. परंतु, खान यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

यंदा आशिया चषक होणारच आहे. पाकिस्तान संघ इंग्लंड दौर्‍याहून २ सप्टेंबरला मायदेशी परतेल. त्यामुळे आम्ही आशिया चषक स्पर्धा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये आयोजित करु शकतो. त्याआधी आम्हाला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. यंदा श्रीलंकेत आशिया चषक होईल अशी आम्हाला आशा आहे, कारण तिथे करोनाचे फारसे रुग्ण नाहीत. परंतु, श्रीलंकेत शक्य न झाल्यास युएई या स्पर्धेच्या आयोजनासाठी तयार आहे, असे वसिम खान यांनी सांगितले. यंदा आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. परंतु, पीसीबीने यंदाची स्पर्धा श्रीलंकेत घेण्यास परवानगी दिली असून पुढील स्पर्धा पाकिस्तानमध्ये होईल असेही खान यांनी नमूद केले.

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडल्यास या काळात इतर सामने आणि स्पर्धा खेळण्याबाबत पाकिस्तान बोर्ड विचार करत आहे. याबाबत खान म्हणाले की, झिम्बाब्वेविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळल्यानंतर आम्ही डिसेंबरमध्ये न्यूझीलंड दौर्‍यावर जाऊ. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिका संघाने पाकिस्तानचा दौरा करण्याची तयारी दर्शवली आहे. आम्ही या मालिकांचा विचार करत आहोत.

First Published on: June 25, 2020 5:11 AM
Exit mobile version