Olympics : बीडब्ल्यूएफच्या घोषणेनंतर सायना, श्रीकांत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार नाहीत हे पक्के

Olympics : बीडब्ल्यूएफच्या घोषणेनंतर सायना, श्रीकांत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार नाहीत हे पक्के

सायना नेहवाल, श्रीकांत ऑलिम्पिकला मुकणार

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत टोकियो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympic) पात्र ठरणार नाहीत हे पक्के झाले आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची अंतिम तारीख १५ जून असून त्याआधी कोणतीही पात्रता स्पर्धा होणार नसल्याची घोषणा जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने (BWF) केली आहे. ‘टोकियो २०२० ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी पात्र ठरण्याच्या अंतिम तारखेआधी कोणीही स्पर्धा होणार नाही,’ असे बीडब्ल्यूएफने आपल्या पत्रकात म्हटले. भारताचे केवळ चार बॅडमिंटनपटू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. पुरुष दुहेरीतील भारतीय जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल.

अव्वल १६ मध्ये असणे गरजेचे

यंदा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यास खेळाडूंनी जागतिक क्रमवारीत अव्वल १६ मध्ये असणे गरजेचे आहे. २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारी सायना सध्या महिलांच्या जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर आहे. तसेच पुरुषांमध्ये श्रीकांत २० व्या स्थानी आहे. त्यामुळे हे दोघेही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरले.

जागतिक क्रमवारीत घसरण

सायना ही भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. परंतु, मागील काही काळात तिला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तसेच तिला दुखापतींनीही सतावले आहे. त्यामुळे जागतिक क्रमवारीत तिची घसरण झाली आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र न ठरण्याची ही सायनाची २००८ नंतर पहिलीच वेळ असेल. तिने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती भारताची पहिलीवहिली बॅडमिंटनपटू होती.
First Published on: May 28, 2021 4:47 PM
Exit mobile version