Tokyo Olympics : तिरंदाज प्रविण जाधवचे आव्हान संपुष्टात; वर्ल्ड नंबर वन खेळाडूकडून पराभूत

Tokyo Olympics : तिरंदाज प्रविण जाधवचे आव्हान संपुष्टात; वर्ल्ड नंबर वन खेळाडूकडून पराभूत

तिरंदाज प्रविण जाधवचे आव्हान संपुष्टात

भारताचा तिरंदाज प्रविण जाधवचे टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. प्रविणने उत्कृष्ट सुरुवात करताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडूला पराभूत केले होते. परंतु, दुसऱ्या फेरीत त्याची गाठ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अमेरिकेच्या ब्रेडी एलिसनशी पडली. या लढतीत त्याला पराभव पत्करावा लागला. प्रविणने जागतिक स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेत्या आणि २०१६ रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या एलिसनला झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची ही झुंज अपयशी ठरली. प्रविणने हा सामना सलग तीन सेटमध्ये ०-६ असा गमावला.

एलिसनला झाला अनुभवाचा फायदा

प्रविण आणि एलिसन यांच्यातील उप-उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरु होण्यापूर्वी हवेचा वेग वाढला. याचाच फटका दोन्ही खेळाडूंना बसला. परंतु, एलिसनने अनुभव पणाला लावला. त्याने पहिला सेट २८-२७ अशा फरकाने जिंकत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येही प्रविणने झुंज दिली. परंतु, एलिसनने हा सेट २७-२६ असा पुन्हा एका गुणाच्या फरकाने जिंकत सामन्यात ४-० अशी आघाडी मिळवली. तिसऱ्या सेटमध्ये प्रविणने ८,८,७ गुणांवर बाण मारला. परंतु, ते जिंकण्यासाठी पुरेसे नव्हते. एलिसनने हा सेटही जिंकत सामना ६-० अशा मोठ्या फरकाने जिंकला.

बाजार्जहापोव्हला दिलेला पराभवाचा धक्का

त्याआधी प्रविणने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रशियाच्या गाल्सन बाजार्जहापोव्हला पराभवाचा धक्का दिला होता. प्रविणने पहिल्या फेरीतील ही लढत ६-० अशी सरळ सेटमध्ये जिंकली होती. त्याने या लढतीचे तीन सेट अनुक्रमे २९-२७, २८-२७, २८-२४ असे जिंकत स्पर्धेत आगेकूच केली होती. तसेच तरुणदीप रायचाही दुसऱ्या फेरीत पराभव झाला. त्याचा इस्राईलच्या इताय शॅनीने पराभव केला. या दोन्ही खेळाडूंमध्ये ५-५ अशी बरोबरी असल्याने शूट-ऑफ झाले. यात शॅनीने १०-९ अशी बाजी मारली.

First Published on: July 28, 2021 1:58 PM
Exit mobile version