Tokyo Olympic : महिला सायकलपटूला वाटलं जिंकलं गोल्ड मेडल, पण हातात आलं…

Tokyo Olympic : महिला सायकलपटूला वाटलं जिंकलं गोल्ड मेडल, पण हातात आलं…

सायकलपटू अनेमिक वॅन व्लेऊटेनला वाटले तिने सुवर्णपदक जिंकले

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणे हे प्रत्येकच खेळाडूचे स्वप्न असते. सुवर्ण कामगिरी केल्यावर खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. परंतु, एखाद्या खेळाडूला आपण सुवर्णपदक जिंकले, असे वाटत असतानाच प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असेल तर? असाच काहीसा प्रकार टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळाला. हॉलंडची सायकलपटू अनेमिक वॅन व्लेऊटेनला (Annemiek Van Vleuten) सुवर्णपदक जिंकले असे वाटल्याने तिने हात उंचावत आनंद साजरा केला. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. परंतु, काही मिनिटांनी व्लेऊटेनला जेव्हा सत्य समजले, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले.

व्लेऊटेनला मिळाले रौप्यपदक

अनेमिक वॅन व्लेऊटेनने खरे तर सुवर्ण नाही, तर रौप्यपदक जिंकले. ऑस्ट्रियाच्या अ‍ॅना किसेनहॉफरने व्लेऊटेनच्या आधी ७५ सेकंद ही शर्यत पूर्ण केली होती. ऑलिम्पिकमध्ये सायकलपटूंना सहाय्यक दिला जात नाही. त्यामुळेच हा गोंधळ झाल्याचे शर्यत संपल्यावर व्लेऊटेन म्हणाली. ‘मी जेव्हा अंतिम रेष पार केली, तेव्हा मला वाटले की मी सुवर्णपदक जिंकले. सहाय्यकाविना खेळावे लागते, तेव्हा काय होऊ शकते हे या शर्यतीत दिसले,’ असे व्लेऊटेन म्हणाली. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये वॅन व्लेऊटेनचा अपघात झाला होता. यंदा मात्र तिने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.

अ‍ॅना किसेनहॉफरने पटकावले सुवर्ण 

या शर्यतीत ऑस्ट्रियाच्या अ‍ॅना किसेनहॉफरने सुवर्णपदकाची कमाई केली. १४७ किलोमीटरच्या या सायकल शर्यतीतील अखेरच्या ४० किलोमीटरमध्ये किसेनहॉफरने आघाडी मिळवली. तिने ही आघाडी शेवटपर्यंत राखली. १८९६ नंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती ऑस्ट्रियाची पहिलीच सायकलपटू ठरली. किसेनहॉफर सध्या कोणत्याही व्यावसायिक संघाशी करारबद्ध नाही. परंतु, आता तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

First Published on: July 26, 2021 1:47 PM
Exit mobile version