Tokyo Olympic : छोरियां छोरों से कम हैं के!

Tokyo Olympic : छोरियां छोरों से कम हैं के!

Tokyo Olympic : छोरियां छोरों से कम हैं के!

‘म्हारी छोरियां छोरों से कम हैं के,’ हे दंगल चित्रपटातील आमिर खानचे प्रचंड लोकप्रिय झालेले वाक्य सध्याच्या घडीला अगदी योग्य लागू पडते. कोणे एके काळी भारतामध्ये महिला = चूल आणि मूल हे एक समीकरण होते. मात्र, कालांतराने हे चित्र पालटू लागले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. भारतात आता प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करत आहेत. क्रीडा क्षेत्रही याला अपवाद ठरलेले नाही. भारताच्या महिला क्रीडापटू अभिमानास्पद कामगिरी करत जगात भारताची प्रतिमा उंचावत आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये याचाच प्रत्यय येत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसांत भारताच्या महिला खेळाडूंनी आपला ठसा उमटवल्याचे पाहायला मिळाले.

भारताने लंडन ऑलिम्पिकमध्ये एकूण सहा पदके जिंकली होती. ही भारताची ऑलिम्पिक स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरी! यंदा मात्र भारत पदकांच्या बाबतीत दुहेरी संख्या गाठेल असे म्हटले जात आहे. भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकची सुरुवातही दमदार झाली आहे. या स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले आणि याचे श्रेय एका महिला खेळाडूलाच जाते.

वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक पटकावत भारताला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमधील पहिले पदक जिंकवून दिले. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती कर्णम मल्लेश्वरीनंतरची (२००० सिडनी) पहिलीच वेटलिफ्टर ठरली. तिच्याकडून भारताच्या इतर महिला खेळाडूंनीही प्रेरणा घेत दमदार कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे.

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि बॉक्सर मेरी कोमला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारताच्या या स्टार महिला खेळाडूंनी सुवर्णपदकापर्यंतच्या प्रवासाची रविवारी उत्तम सुरुवात केली आहे. सिंधूला तिचा पहिला सामना जिंकण्यात यश आले, तर मेरीने सलामीची लढत जिंकून उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. मेरीने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि सिंधूने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. आता या दोघांनाही एकाच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात यश आल्यास आश्चर्य वाटायला नको.

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने रविवारी महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामना गमावला. परंतु, तिचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हीच खूप मोठी गोष्ट होती. मुलाच्या जन्मामुळे २०१८ च्या मध्यापासून २०२० च्या सुरुवातीपर्यंत सानिया टेनिस कोर्टपासून दूर होती. त्याआधी तिला काही दुखापतीही झाल्या. मात्र, या सर्व आव्हानांवर मात करत तिने ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला. सानियाचे हे चौथे ऑलिम्पिक असून ही कामगिरी करणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू आहे.

त्याचप्रमाणे टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रानेही टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दोन दिवसांत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तसेच नेमबाज मनू भाकरनेही बंदुकीत बिघाड झाल्यानंतर हार न मानता १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात खेळत राहण्याची जिद्द दाखवली. तिला स्पर्धेत आगेकूच करता आली नसली, तरी तक्रार न करता खेळत राहण्याच्या तिच्या या जिद्दीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. भारताला आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एकूण २९ पदके मिळाली असून यापैकी सहा पदके महिला खेळाडूंनी जिंकवून दिली आहेत. यंदा या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे, हे नक्की!

First Published on: July 25, 2021 10:58 PM
Exit mobile version