Tokyo Olympics : भारतीय कुस्तीपटूंनी फड गाजवला; दहीया, दीपक पुनियाची उपांत्य फेरीत धडक

Tokyo Olympics : भारतीय कुस्तीपटूंनी फड गाजवला; दहीया, दीपक पुनियाची उपांत्य फेरीत धडक

रविकुमार दहीया आणि दीपक पुनिया यांनी उपांत्य फेरीत धडक मारली

भारतीय कुस्तीपटूंनी गुरुवारी ऑलिम्पिकचा फड गाजवला आहे. रविकुमार दहीया आणि दीपक पुनिया यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दहियाने पुरुषांच्या ५७ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत बल्गेरियन कुस्तीपटू जॉर्जी व्हॅलेटीनोव्ह व्हँग्लोव्हचा १४-४ असा पराभव केला. तर ८६ किलो वजनी गटात दीपक पुनियाने उपांत्यपूर्व फेरीत चीनी कुस्तीपटू लिन झुशेनचा ६-३ असा पराभव केला. रवी आणि दीपक या दोघांनी उपांत्य फेरी गाठून भारतासाठी पदकाच्या आशा वाढवल्या आहेत. दोन्ही कुस्तीपटूंचा उपांत्य सामना आजच होणार आहे.

रवी कुमारने पहिल्या सामन्याप्रमाणे आपला दुसरा सामना सहजरित्या जिंकला. तर दुसरीकडे, दीपक पुनियाचा उपांत्यपूर्व सामना रोमांचक होता. लिनविरुद्धच्या सामन्याचे शेवटचे ४० सेकंद शिल्लक असताना पुनियावर पराभवाचं सावट होतं. मात्र, शेवटच्या काही सेकंदात बाजी लावून लिनला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली. दरम्यान, उपांत्य सामन्यात दीपक पुनियाचा सामना अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिसशी होणार आहे. तर, रवीकुमार दहीयाचा मुकाबला कझाकिस्तानच्या नुरिसलाम सनायव सोबत होणार आहे. हा सामना दुपारी २ वाजून ४५ मिनीटांनी होणार आहे.

दरम्यान, याआधीच्या सामन्यात दीपक पुनियाने नायजेरियन कुस्तीपटूला १२-१ ने पराभत करत उपांत्यपूर्व फेरीत सामन्यात धडक मारली होती. तर रवीकुमार दहीयाने कोलंबियाच्या कुस्तीपटूला १३-२ ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

 

First Published on: August 4, 2021 10:44 AM
Exit mobile version