Tokyo Olympics : पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यात मनू भाकर पाचव्या, तर राही २५ व्या स्थानी

Tokyo Olympics : पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यात मनू भाकर पाचव्या, तर राही २५ व्या स्थानी

पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यात मनू भाकर पाचव्या स्थानी

भारताच्या नेमबाजांकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात होती. परंतु, नेमबाजांना अजून आपली छाप पाडण्यात यश आलेले नाही. परंतु, पिस्तूल नेमबाज मनू भाकर आणि राही सरनोबत यांच्या पदकाच्या आशा अजूनही कायम आहे. गुरुवारी झालेल्या महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूलच्या पात्रता फेरीतील पहिल्या टप्प्यात मनू आणि राहीला अनुक्रमे पाचव्या आणि २५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता पात्रता फेरीचा दुसरा टप्पा ‘रॅपिड राऊंड’ शुक्रवारी पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्याअखेरीस सर्बियाची झोराना अर्नावतोव्हिच २९६ गुणांसह अव्वल, तर ग्रीसची अ‍ॅना कोराकाकी २९४ गुणांसह दुसऱ्या स्थानी होती.

मनू भाकरचे २९२ गुण 

तिसऱ्या रिलेमध्ये, १९ वर्षीय मनू भाकरने पात्रता फेरीतील पहिल्या टप्प्याच्या पहिल्या दोन मालिकांमध्ये ९७ आणि ९७ गुण मिळवले. त्यानंतर तिसऱ्या मालिकेत तिने ९८ गुण मिळवत अव्वल पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवले होते. दुसऱ्या मालिकेत तीन गुणांनंतर तिने अखेरच्या पाचही प्रयत्नांत १०-१० गुण मिळवले. त्यामुळे ४४ नेमबाजांच्या या फेरीत मनूने २९२ गुणांसह पाचवे स्थान मिळवले.

राही सरनोबत २५ व्या स्थानी

त्याआधी पहिल्या १० नेमबाजांच्या रिलेमध्ये, राहीने सुरुवातीला ९६ आणि त्यानंतर ९७ गुण मिळवले. मात्र, तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. एक आठ आणि काही ९ गुणांमुळे अखेरच्या मालिकेत तिला एकूण केवळ ९४ गुणांवर समाधान मानावे लागले. तिला एकूण ३०० मध्ये २८७ गुणच मिळवता आले. त्यामुळे ती १० नेमबाज असलेल्या तिच्या रिलेमध्ये सातव्या, तर एकूण २५ व्या स्थानी राहिली.

First Published on: July 29, 2021 4:37 PM
Exit mobile version