Tokyo Olympics : ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचा शिरकाव; एक जण पॉझिटिव्ह 

Tokyo Olympics : ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचा शिरकाव; एक जण पॉझिटिव्ह 

ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचा शिरकाव; एक जण पॉझिटिव्ह

टोकियो ऑलिम्पिकला आता एका आठवड्याहूनही कमी कालावधी शिल्लक आहे. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा २३ जुलै रोजी पार पडणार आहे. परंतु, त्याआधीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि जपानी आयोजकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले होते. परंतु, टोकियोत अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून आता कोरोनाने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये (क्रीडानगरी) शिरकाव केला आहे. शनिवारी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. परंतु, हा रुग्ण खेळाडू आहे की अधिकारी हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

कोरोनाबाधित व्यक्ती परदेशातील

ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोना चाचणीनंतर रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे टोकियो आयोजन समितीचे प्रवक्ते मासा टाकाया यांनी सांगितले. तसेच या व्यक्तीला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले. जपानमधील प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, कोरोनाबाधित व्यक्ती ही परदेशातील आहे. ऑलिम्पिकमुळे जपानमधील कोरोनाचा संसर्ग वाढू शकेल अशी भीती याआधीच नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बहुतांश स्थानिक नागरिकांचा ऑलिम्पिकला विरोध होता.

योग्य ती खबरदारी घेत आहोत

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास आयोजकांकडून योग्य ती पावले उचलण्यात येतील, अशी हमी टोकियो २०२० च्या अध्यक्षा सेइके हाशिमोटो यांनी दिली आहे. कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. मात्र, जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास आयोजकांकडून योग्य ती पावले उचलण्यात येतील. आम्ही त्यासाठी योग्य ती योजना आखू, असे हाशिमोटो यांनी स्पष्ट केले. तसेच जपानमध्ये परदेशातून येणारे खेळाडू थोडे चिंतेत असतील याची आपल्याला जाण असल्याचेही त्या म्हणाल्या.

First Published on: July 17, 2021 2:50 PM
Exit mobile version