Tokyo Olympics : भारताची बॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी; पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत

Tokyo Olympics : भारताची बॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी; पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत

पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत

भारताच्या महिला बॉक्सर्सनी यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. मेरी कोमने तिचा पहिल्या फेरीतील सामना जिंकला होता. तर मंगळवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटात लोव्हलिना बोर्गोहेनला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले होते. त्यापाठोपाठ बुधवारी ७५ किलो वजनी गटात भारताच्या पूजा राणीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता पदकापासून ती केवळ एक विजय दूर आहे. ३० वर्षीय पूजा राणीने ऑलिम्पिक स्पर्धांमधील पदार्पणाच्या लढतीत अल्जेरियाच्या २० वर्षीय इचारक चैबचा ५-० असा धुव्वा उडवला. पूजा राणी आणि चैबच्या वयातील १० वर्षांचा फरक या लढतीत दिसून आला. अनुभवी पूजाच्या हल्ल्यांपुढे युवा चैबचा निभाव लागला नाही.

दोघींचेही ऑलिम्पिक पदार्पण 

दोन वेळच्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पूजाने या लढतीत सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. तिन्ही फेरीत पूजाने चैबवर वर्चस्व गाजवले. या दोघींचेही हे ऑलिम्पिक पदार्पण ठरले. परंतु, पूजाच्या गाठीशी खूप अनुभव असल्याने दबाव असतानाही संयम राखण्यात तिला यश आले. चैबने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा फायदा पूजाला झाला. तिने उत्कृष्ट प्रतिहल्ला करत ही लढत ५-० अशा मोठ्या फरकाने जिंकली.

First Published on: July 28, 2021 4:07 PM
Exit mobile version