Tokyo Olympics : ‘मी तुझ्या भावना समजू शकते’! सिंधूच्या प्रोत्साहनामुळे यिंगला अश्रू अनावर

Tokyo Olympics : ‘मी तुझ्या भावना समजू शकते’! सिंधूच्या प्रोत्साहनामुळे यिंगला अश्रू अनावर

सिंधूने काढली ताई झू यिंगची समजूत 

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताई झू यिंगला टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीतील चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात यिंगला चीनच्या चेन यु फेईने १८-२१, २१-१९, १८-२१ असे पराभूत केले. यिंगचे हे तिसरे ऑलिम्पिक होते आणि तिला पहिल्यांदाच पदक जिंकण्यात यश आले. मात्र, ती रौप्यपदक जिंकून फार खुश नव्हती. यिंगला सुवर्णपदक पटकवायचे होते. त्यामुळे तिला दुःख झाले होते. भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूलाही अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मी तुझ्या भावना समजू शकते, असे म्हणत सिंधूने यिंगला समजावले.

सिंधूने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला

अंतिम सामन्यानंतर सिंधू माझ्याजवळ आली. ‘अंतिम सामना गमावल्याने तुला दुःख झाले असणार हे मी समजू शकते. तू या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलीस, पण आज तुझा दिवस नव्हता. मी तुझ्या भावना नक्कीच समजू शकते,’ असे सिंधू मला म्हणाली. मला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याचा तिचा प्रयत्न होता. त्यामुळे मला अश्रू अनावर झाले. मी सुवर्णपदक जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, त्यात मला अपयश आल्याने मी खूप दुःखी होते, असे यिंगने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले.

यिंगमुळेच सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरे

विशेष म्हणजे, यिंगमुळेच सिंधूचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यिंगने सिंधूचा २१-१८, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. मात्र, सिंधूला रविवारी कांस्यपदकाचा सामना जिंकण्यात यश आले. तर त्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात यिंग पराभूत झाली. सिंधूने खिलाडूवृत्ती दाखवत यिंगची समजूत काढली.

First Published on: August 2, 2021 3:20 PM
Exit mobile version