Tokyo Olympics : स्वित्झर्लंडचा टेनिसपटू वॉवरिंकाची ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार    

Tokyo Olympics : स्वित्झर्लंडचा टेनिसपटू वॉवरिंकाची ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार    

स्टॅन वॉवरिंकाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार

ऑलिम्पिक स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता टेनिसपटू स्टॅन वॉवरिंकाने आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. तीन वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या वॉवरिंकाने याआधी पुरुष दुहेरीत रॉजर फेडररसोबत खेळताना २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, डाव्या पायावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्याला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळता येणार नाही. ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे.

लवकरात लवकर पुनरागमन करण्याचे लक्ष्य

वॉवरिंकाला ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नसल्याचे आणि टोकियोमध्ये स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करता येणार नसल्याचे दुःख आहे. मात्र, त्याची दुखापत अजून पूर्णपणे बरी झालेली नसून लवकरात लवकर टेनिस कोर्टवर पुनरागमन करणे हे त्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, असे वॉवरिंकाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

नदाल, सेरेनानेही घेतली माघार 

वॉवरिंकाच्याआधी राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, सिमोना हालेप आणि डॉमिनिक थीम यांसारख्या आघाडीच्या टेनिसपटूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. विश्रांतीसाठी आणि पूर्णपणे फिट होण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने विम्बल्डन व ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतल्याचे ३५ वर्षीय नदाल म्हणाला होता.

First Published on: June 29, 2021 8:30 PM
Exit mobile version