Tokyo Olympics : ‘ऐतिहासिक’ टोकियो ऑलिम्पिक यशस्वीरित्या पार पडणारच; IOC अध्यक्षांना विश्वास

Tokyo Olympics : ‘ऐतिहासिक’ टोकियो ऑलिम्पिक यशस्वीरित्या पार पडणारच; IOC अध्यक्षांना विश्वास

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच

पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मागील वर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलणे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (IOC) भाग पडले होते. यंदा ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधी होणार आहे. परंतु, जपानमध्ये आणि विशेषतः टोकियोत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. टोकियोत आणीबाणी लागू करण्यात आली असून ऑलिम्पिक प्रेक्षकांविना घ्यावी लागणार आहे. मात्र, या सर्व अडथळ्यांवर मात करून यंदाची ‘ऐतिहासिक’ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वीरित्या पार पडेल, असा आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांना विश्वास आहे.

चाहत्यांना उत्कृष्ट खेळ पाहायला मिळेल

सध्याच्या परिस्थितीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ही स्पर्धा वर्षभराने पुढे ढकलण्यात आली असली तरी खेळाडूंनी जिद्द सोडली नाही. त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले. आव्हाने सर्व खेळाडूंसाठी समान होते. मात्र, यंदा चाहत्यांना उत्कृष्ट खेळ पाहायला मिळेल, नवे ऑलिम्पिक स्टार्स उदयाला येतील आणि महान खेळाडू या स्पर्धेतून तयार होतील याची मला खात्री आहे. टोकियो ऑलिम्पिक यशस्वीरित्या पार पडेल असा मला विश्वास असल्याचे बॅच यांनी सांगितले.

ऑलिम्पिकमुळे कोरोनाचा धोका वाढणार नाही

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने टोकियोत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तसेच बऱ्याच आघाडीच्या खेळाडूंनी कोरोनामुळे किंवा अन्य काही कारणांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तसेच टोकियोतील बहुतांश नागरिकांचा ऑलिम्पिकला विरोध आहे. परंतु, ऑलिम्पिकमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांचे बॅच यांनी समर्थन केले आहे. बहुतांश खेळाडूंनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले असून हे खेळाडू बायो-बबलमध्ये राहणार आहेत, असे सांगतानाच बॅच यांनी ऑलिम्पिकमुळे कोरोनाचा धोका वाढणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

First Published on: July 14, 2021 7:44 PM
Exit mobile version