Tokyo Olympics : सिंधू मिळवून देणार भारताला ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक सुवर्ण?

Tokyo Olympics : सिंधू मिळवून देणार भारताला ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक सुवर्ण?

सिंधू मिळवून देणार भारताला ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक सुवर्ण?

पाच वर्षांपूर्वी ऑलिम्पिक पदार्पणात रौप्यपदकाची कमाई करणारी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरीसाठी उत्सुक आहे. ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी बॅडमिंटन स्पर्धांना सुरुवात होईल. या स्पर्धेमध्ये सिंधूच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत केवळ एक वैयक्तिक सुवर्णपदक जिंकता आले असून सिंधूचे यंदा सुवर्ण कामगिरीचे लक्ष्य आहे. बॅडमिंटन स्पर्धांना शनिवारपासून सुरुवात होणार असली सिंधू पहिला सामना रविवारी खेळेल. परंतु, पुरुष एकेरीत साई प्रणित, तसेच पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रणकिरेड्डी हे भारतीय बॅडमिंटनपटू शनिवारी पहिल्या फेरीतील सामना खेळतील.

सिंधूचा महिला एकेरीच्या ‘जे’ गटात समावेश

२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये पदार्पणातच सिंधूला रौप्यपदक जिंकण्यात यश आले होते. अंतिम सामन्यात तिला स्पेनच्या कॅरोलिना मरीनकडून पराभव पत्करावा लागला होता. दुखापतीमुळे मरीन यंदाच्या स्पर्धेत खेळणार नसून याचा सिंधूला फायदा होऊ शकेल. टोकियो ऑलिम्पिकसाठी सिंधूचा महिला एकेरीच्या ‘जे’ गटात समावेश आहे. या गटात तिला हॉंगकॉंगच्या चेउन्ग एनगन यी (क्रमवारीत ३४ व्या स्थानी) आणि इस्राईलच्या कसेनिआ पोलिकार्पोव्हा (क्रमवारीत ५८ व्या स्थानी) यांचा सामना करावा लागेल.

सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार

रिओ ऑलिम्पिकमध्ये २१ वर्षीय सिंधूकडून पदकाची अपेक्षा केली जात नव्हती. मात्र, या स्पर्धेत आणि त्यानंतर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे यंदा सिंधूला सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात आहे. नेमबाज अभिनव बिंद्राने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकवून दिले होते. यंदा सिंधू या यादीत समाविष्ट होते का, याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

First Published on: July 23, 2021 9:38 PM
Exit mobile version