सध्या क्रिकेटपटूंवर खूप ताण!

सध्या क्रिकेटपटूंवर खूप ताण!

एबी डिव्हिलियर्स मत

दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चांगली कामगिरी करत असतानाच मला निवृत्ती घ्यायची होती, असे डिव्हिलियर्सने त्यावेळी सांगितले होते. तसेच निवृत्तीमागे क्रिकेटचे व्यग्र हेसुद्धा एक कारण आहे असे डिव्हिलियर्सने स्पष्ट केले होते. विश्रांती घ्यायची की नाही याचा निर्णय प्रत्येक खेळाडूने स्वतःहून घ्यायचा असला तरी सध्या खेळाडूंवर खूप ताण आहे, असे मत आता डिव्हिलियर्सने व्यक्त केले आहे.

प्रत्येक खेळाडूने परिस्थितीचा विचार करुन आपला निर्णय घेतला पाहिजे. मी एका टप्प्यावर पोहोचलो होतो, जेव्हा मला पत्नी आणि दोन मुलांसोबत जास्त वेळ घालवायचा होता. तसेच कुटुंब आणि क्रिकेट यात समतोल राखायचा होता. सध्या आघाडीच्या खेळाडूंवर मानसिक आणि शारीरिकदृष्टया खूप ताण असतो. त्यामुळे मी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रत्येक खेळाडूने आपला निर्णय स्वतःहून घ्यायचा असतो, असे डिव्हिलियर्स म्हणाला.

पुनरागमनाचा अजून विचार नाही!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही डिव्हिलियर्स जगभरातील विविध टी-२० स्पर्धांमध्ये खेळत आहे आणि चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे यावर्षी ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-२० विश्वचषकासाठी त्याचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन होऊ शकते असे म्हटले जात आहे. त्याविषयी डिव्हिलियर्स म्हणाला, मी घाईत कोणताही निर्णय घेणार नाही. सध्या मी फक्त इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेबाबत आणि रॉयल चॅलेंजर्स संघाला मदत करण्याबाबत विचार करत आहे. त्यानंतर मी पुढचा निर्णय घेईन, असे डिव्हिलियर्सने स्पष्ट केले.

First Published on: March 19, 2020 5:30 AM
Exit mobile version