IND vs ENG : काही लोकांना तक्रार करायची सवय असते; खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना गावस्करांचे उत्तर

IND vs ENG : काही लोकांना तक्रार करायची सवय असते; खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना गावस्करांचे उत्तर

सुनील गावस्कर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना चेन्नईत सुरु आहे. या सामन्यात पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळत होती. त्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनसह काही माजी क्रिकेटपटूंनी या खेळपट्टीवर टीका केली. ‘प्रत्येक क्षणाला काही तरी होत असल्याने हा सामना पाहताना मजा येत आहे. परंतु, अगदी खरे सांगायचे, तर ही खेळपट्टी इतकी वाईट असल्याचे पाहून धक्का बसला,’ असे वॉनने ट्विटमध्ये लिहिले. मात्र, भारताने याच खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना तीनशे धावांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड असले, तरी अशक्य नाही, असे मत भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.

फिरकीपटूंना मदत असल्यास गैर काय?

रोहित शर्माने पहिल्या डावात १६१ धावांची खेळी केली होती. त्यामुळे या खेळपट्टीवर टीका करणे योग्य नाही. काही लोकांना तक्रार करायची सवयच असते. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळत असेल, तर त्यात गैर काय? इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर चेंडू पहिल्या दिवसापासून स्विंग आणि सीम होतो. तेव्हा मात्र कोणीही खेळपट्टीवर टीका करत नाही. मात्र, भारतात खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्यास लोक तक्रार करायला सुरुवात करतात, असे गावस्कर म्हणाले.

भारताची उत्कृष्ट फलंदाजी

इंग्लंडच्या फलंदाजांना दोन्ही डावांमध्ये धावा करणे अवघड गेले असले, तरी भारतीय फलंदाजांना या खेळपट्टीवर धावा करण्यात यश आले. पहिल्या डावात रोहित शर्माने, तर दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने शतक झळकावले. तसेच अजिंक्य रहाणे, रिषभ पंत आणि कर्णधार विराट कोहली यांनाही अर्धशतके करण्यात यश आले.

First Published on: February 15, 2021 10:10 PM
Exit mobile version