UEFA EURO : इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्णभेदी टीका करणाऱ्या चाहत्यांना पीटरसनने सुनावले

UEFA EURO : इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्णभेदी टीका करणाऱ्या चाहत्यांना पीटरसनने सुनावले

इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्णभेदी टीका करणाऱ्या चाहत्यांना केविन पीटरसनने सुनावले

युएफा युरो २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडला पराभूत केले. इंग्लंडमधील वेम्बली स्टेडियममध्ये झालेला हा सामना ९० मिनिटे आणि ३० अतिरिक्त मिनिटांच्या खेळानंतर १-१ असा बरोबरीत होता. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूट-आऊटमध्ये इंग्लंडच्या मार्कस रॅशफोर्ड, जेडन सँचो आणि बुकायो साका या खेळाडूंना चेंडू गोलजाळ्यात मारता आला नाही. त्यामुळे इंग्लंडने हा सामना गमावला. इंग्लंडच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये आणि विशेषतः सोशल मीडियावरून या तिन्ही कृष्णवर्णीय खेळाडूंवर वर्णभेदी टीका केली. ही गोष्ट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला अजिबातच आवडली नाही आणि त्याने चाहत्यांना सुनावले.

शिवीगाळ कशासाठी?

सामना संपल्यावर घरी जाण्यासाठी गाडीपर्यंत पोहोचण्याचा डिलनसोबतचा (पीटरसनचा मुलगा) माझा प्रवास फार भीतीदायक होता. अत्यंत वाईट! २०२१ सालात अशाप्रकारची वागणूक? ज्या खेळाडूंनी आपल्याला इतका आनंद दिला, त्यांना शिवीगाळ कशासाठी? २०३० फिफा वर्ल्डकप अजूनही इंग्लंडमध्ये झाला पाहिजे असे वाटते का? असे सवाल पीटरसनने उपस्थित केले.

पंतप्रधान जॉन्सन यांचे आवाहन 

त्याआधी युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही खेळाडूंवर वर्णभेदी टीका न करता त्यांचे कौतुक करण्याचे आवाहन इंग्लिश चाहत्यांना केले होते. तसेच जे या शिवीगाळासाठी जबाबदार आहेत, त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे, असे खडे बोलही जॉन्सन यांनी सुनावले होते. इंग्लंडच्या किंवा इंग्लंडमध्ये क्लब फुटबॉल खेळणाऱ्या फुटबॉलपटूंवर सातत्याने वर्णभेदी टीका होत असल्याचे पाहायला मिळते. परंतु, हे थांबण्यासाठी अजूनही कठोर पावले उचलण्यात येत नाहीत.

First Published on: July 12, 2021 9:25 PM
Exit mobile version