UEFA Nations League : इंग्लंडकडून स्पेन पराभूत

UEFA Nations League : इंग्लंडकडून स्पेन पराभूत

इंग्लंडसाठी राहीम स्टर्लिंगने केले २ गोल (सौ-independent)

युएफा नेशन्स लीग या स्पर्धेच्या रंगतदार सामन्यात इंग्लंडने स्पेनचा ३-२ असा पराभव केला. इंग्लंडने तब्बल ३१ वर्षांनी स्पेनचा पराभव केला आहे. स्पेनने १५ वर्षांनी आपल्या घरच्या मैदानावर स्पर्धात्मक सामना गमावला आहे. या सामन्यात इंग्लंडसाठी राहीम स्टर्लिंगने २ आणि मार्कस रॅशफोर्डने १ गोल केला.

असा झाला सामना

या सामन्यात सुरुवातीला स्पेनने आक्रमक खेळ केला. पण १६ व्या मिनिटाला इंग्लंडने काउंटर अटॅक करत गोल केला. इंग्लंडसाठी हा गोल राहीम स्टर्लिंगने केला. त्यानंतर स्पेनने पुन्हा आक्रमण केले. पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. यानंतर इंग्लंडने चांगला खेळ केला. २९ व्या मिनिटाला हॅरी केनच्या पासवर मार्कस रॅशफोर्डने गोल करत इंग्लंडची आघाडी २-० केली. तर ३८ व्या मिनिटाला हॅरी केनच्या पासवर राहीम स्टर्लिंगने आपला दुसरा आणि इंग्लंडचा तिसरा गोल केला. त्यामुळे मध्यंतरापर्यंत इंग्लंडकडे ३-० अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर स्पेनने अधिकच आक्रमक खेळ केला. ५८ व्या मिनिटाला पाको अल्कासेरने गोल करत इंग्लंडची आघाडी कमी केली. यानंतर स्पेनला बराच वेळ गोल करण्यात अपयश आले. अखेर सामना संपण्याच्या काही क्षण आधी कर्णधार सर्जिओ रॅमोसने स्पेनचा दुसरा गोल केला. पण स्पेनचा या सामन्यात ३-२ असा पराभव झाला.

गट ए४ मध्ये स्पेनच अव्वल

युएफा नेशन्स लीगच्या गट ए४ मध्ये स्पेन, इंग्लंड आणि क्रोएशिया या संघांचा समावेश आहे. या गटात स्पेन दोन विजयांसह अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंड १ विजयासह दुसऱ्या स्थानी आहे.
First Published on: October 16, 2018 11:04 PM
Exit mobile version