राफेल नदाल ‘या’ कारणाने उर्वरित मोसमातून आऊट

राफेल नदाल ‘या’ कारणाने उर्वरित मोसमातून आऊट

राफेल नदाल उर्वरित २०२१ मोसमातून आऊट

रॉजर फेडरर आणि गतविजेत्या डॉमिनिक थीम यांच्यापाठोपाठ स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालनेही यंदाच्या अमेरिकन ओपन (US OPEN) स्पर्धेतून माघार घेतली आहे. केवळ हीच स्पर्धा नाही, तर उर्वरित २०२१ मोसमात त्याला खेळता येणार नाही. नदालला मागील काही काळात डाव्या पायाच्या दुखापतीने सतावले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टन येथे झालेल्या स्पर्धेत नदाल खेळला होता. परंतु, त्याला तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्याने टोरंटो ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यावेळीच त्याच्या अमेरिकन ओपन स्पर्धेतील सहभागाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. आता या स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

पूर्णपणे फिट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. दुर्दैवाने मला उर्वरित २०२१ मोसमात खेळता येणार नाही. मला वर्षभराहूनही जास्त काळ पायाच्या दुखापतीने सतावले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी किंवा ही दुखापत कमी व्हावी यासाठी मला आता थोडा वेळ हवा आहे. पुढील काही वर्षे खेळत राहण्यास मी उत्सुक आहे. पूर्णपणे फिट होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. माझी पायाची दुखापत कमी झाल्यास मी माझ्या आवडीची गोष्ट पुढेही करू शकेन. मी खूप मेहनत घेणार आहे, असे नदालने सांगितले.

नदाल, फेडरर दोघेही मुकणार

यंदा अमेरिकन ओपन स्पर्धा ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. नदाल आणि फेडरर हे महान टेनिसपटू दुखापतींमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. फेडररच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे त्याला काही महिने टेनिस कोर्टच्या बाहेर रहावे लागणार आहे. तसेच नदालही या स्पर्धेत खेळणार नसल्याने नोवाक जोकोविचला जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.


हेही वाचा – कोहली सर्वाधिक शिवीगाळ करणारा खेळाडू; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूची टीका


 

First Published on: August 20, 2021 5:11 PM
Exit mobile version