हार्दिक येणार्‍या काळात भारतासाठी खूप महत्त्वाचा

हार्दिक येणार्‍या काळात भारतासाठी खूप महत्त्वाचा

स्टिफन फ्लेमिंगचे मत

हार्दिक पांड्याच्या दमदार अष्टपैलू खेळामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ३७ धावांनी पराभव केला. मुंबईला अखेरच्या षटकांत जलद धावांची गरज असताना पांड्याने ८ चेंडूंत १ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या, तर गोलंदाजीमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह ३ गडी बाद केले. त्यामुळे सामन्यानंतर चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी पांड्याची स्तुती केली. त्यांच्यामते येणार्‍या काळात ज्यात विश्वचषकही होणार आहे त्यात पांड्या भारतासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू असेल.

एक क्रिकेटपटू म्हणून मी हार्दिकचा खूप मोठा चाहता आहे. त्याचा आत्मविश्वास सध्या उंचावलेला आहे आणि तो अखेरच्या षटकांमध्ये खूप चांगली फलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याला थांबवण्यासाठी संघांना विशिष्ट योजना आखाव्या लागत आहेत. आम्ही त्याच्यासाठी ज्या योजना केल्या होत्या त्याबाबत आम्ही खुश होतो. मात्र, आम्ही त्या योजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे केली नाही. हार्दिक एक अप्रतिम खेळाडू आहे. तो मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे आणि येणार्‍या काळात तो भारतासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. त्याला तुम्ही चांगली कामगिरी करण्यापासून रोखू शकलात, तर तुम्हाला सामना जिंकणे जरा सोपे होते. मात्र, या सामन्यात आम्हाला ते जमले नाही, असे फ्लेमिंग म्हणाले. तसेच हार्दिकसारख्या फलंदाजाला अखेरच्या षटकांत मोठे फटके मारण्यापासून रोखण्यासाठी काय केले पाहिजे असे विचारले असता ते म्हणाले, यॉर्कर हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

पांड्याचा मुंबई संघातील सहकारी जेसन बेहरनडॉर्फने पांड्यासोबतच किरॉन पोलार्डचेही कौतुक केले. हार्दिक आणि पोलार्ड यांनी फटकेबाजी करून आम्हाला फ्रंटफूटवर नेले. (फलंदाजीची) आम्ही सुरुवात हळू केली होती. मात्र, तरीही त्या दोघांमुळे आम्ही १७० पर्यंत मजल मारली आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये आम्ही चेन्नईच्या दोन विकेट लवकर घेत त्यांना बॅकफूटवर टाकले व त्यांना पुनरागमन करण्याची संधी दिली नाही, असे आपला पहिला आयपीएल सामना खेळणारा बेहरनडॉर्फ सामन्यानंतर म्हणाला.

First Published on: April 5, 2019 4:36 AM
Exit mobile version