Vijay Hazare Trophy 2018 : रहाणे, अय्यरच्या शतकांमुळे मुंबई विजयी

Vijay Hazare Trophy 2018 : रहाणे, अय्यरच्या शतकांमुळे मुंबई विजयी

रहाणेचे शतक

अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यरच्या शतकांच्या जोरावर मुंबईने विजय हजारे चषकात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. रहाणे (१४८) आणि अय्यरच्या (११०) खेळींमुळे मुंबईने कर्नाटकचा ८८ धावांनी पराभव केला.

रहाणे-अय्यरची २१६ धावांची भागीदारी 

या सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबईने आपल्या फलंदाजीची अप्रतिम सुरूवात केली. मुंबईचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांनी अवघ्या १८ षटकांत १०६ धावांची भागीदारी केली. पृथ्वीने ५३ चेंडूंत ६० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर रहाणेने श्रेयस अय्यरच्या साथीने २१६ धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने ८२ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ११० धावा केल्या. तर कर्णधार अजिंक्य रहाणेने १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १५० चेंडूंत १४८ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने ३६२ धावांचा टप्पा गाठला.

 

श्रेयस अय्यर (सौ – Cricket Addictor)

शम्स मुलानीच्या ४ विकेट

३६३ धावांचा पाठलाग करताना कर्नाटकचा सलामीवीर मयांक अगरवालने ४८ चेंडूंत ६६ धावा केल्या. पण अगरवाल व्यतिरिक्त कर्नाटकच्या एकही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. त्यामुळे त्यांनी हा सामना ८८ धावांनी गमावला. मुंबईकडून गोलंदाज शम्स मुलानीने ४ विकेट घेतल्या.

रहाणे मागील सहा महिन्यांपासून वनडे संघाबाहेर

रहाणे मागील सहा महिन्यांपासून भारतीय एकदिवसीय संघाबाहेर आहे. त्याने फेब्रुवारी २०१८ मध्ये द.आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. पण यानंतर झालेल्या इंग्लंडविरुद्धची मालिका आणि आशिया चषक या स्पर्धांसाठीच्या संघात त्याला स्थान मिळाले नव्हते.
First Published on: September 21, 2018 10:47 PM
Exit mobile version