सोशल मीडियावरही कोहलीच ‘किंग’! रोनाल्डो, मेस्सीच्या यादीत समावेश 

सोशल मीडियावरही कोहलीच ‘किंग’! रोनाल्डो, मेस्सीच्या यादीत समावेश 

इन्स्टाग्राम सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटचे नाव, एका पोस्टमागे कामावतोय 'इतके' रुपये

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. तसेच तो जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूही आहे. तो क्रिकेटच्या मैदानात उतरला आणि एखादा विक्रम झाला नाही, असे फार कमी वेळा होते. मात्र, कोहली मैदानाबाहेरही तितकाच यशस्वी ठरला असून आता त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकताच कोहलीने १०० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला. इतके फॉलोअर्स असणारा कोहली हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच १०० मिलियन चाहते असणारा कोहली आशियातील पहिलाच व्यक्ती ठरला आहे. ‘विराट कोहली – इंस्टाग्रामवर १०० मिलियन फॉलोअर्स असणारा पहिला क्रिकेटपटू,’ असे ट्विट करत आयसीसीने भारतीय कर्णधाराचे कौतुक केले.

१०० मिलियन फॉलोअर्स असणारा चौथा खेळाडू

इंस्टाग्रामवर १०० मिलियन फॉलोअर्स असणारा कोहली हा चौथा खेळाडू आहे. या यादीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डो अव्वल स्थानावर असून इंस्टाग्रामवर त्याचे २६५ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यापाठोपाठ अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी (१८६ मिलियन) आणि ब्राझीलचा फुटबॉलपटू नेयमार (१४७ मिलियन) यांचा क्रमांक लागतो. ३२ वर्षीय कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू मानला जातो. त्याने भारताकडून खेळताना आतापर्यंत ७० शतके केली आहेत.

First Published on: March 2, 2021 4:11 PM
Exit mobile version