कोहलीची बॅट थंडावली! दीड वर्षापासून शतकाचा दुष्काळ

कोहलीची बॅट थंडावली! दीड वर्षापासून शतकाचा दुष्काळ

विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये केलेले अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. केवळ इतकेच नाही, तर त्याची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोहलीच्या नावे तब्बल ७० शतके आहेत. परंतु, मागील काही काळात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये महान सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमापासून आता कोहली केवळ सहा शतके दूर आहे. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके केली होती, तर कोहलीला आतापर्यंत २५४ एकदिवसीय सामन्यांत ४३ शतके करण्यात यश आले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून प्रत्येक सामन्यात मोठ्या धावांची अपेक्षा असते. परंतु, मागील काही काळात त्याला या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत.

नोव्हेंबर २०१९ मध्ये अखेरचे शतक

कोहलीच्या कामगिरीबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करून आता दीड वर्षांहूनही अधिक काळ उलटून गेला आहे. त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये कोलकाता येथे झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध १३६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर ४१ सामन्यांच्या ४६ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये कोहलीला शतकाने हुलकावणी दिली आहे.

४१ सामन्यांत शतक नाही 

बांगलादेशविरुद्ध केलेल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय शतकानंतर कोहलीने ४१ आंतरराष्ट्रीय सामने आणि ४६ डावांमध्ये १७०३ धावा केल्या आहेत. त्याने या धावा ४२.५७ च्या सरासरीने आणि ८६ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. त्याने ८ कसोटी सामन्यांत ३ अर्धशतकांच्या मदतीने ३४५ धावा, १५ एकदिवसीय सामन्यांत ८ अर्धशतकांच्या मदतीने ६४९ धावा, १८ टी-२० सामन्यांत ६ अर्धशतकांच्या मदतीने ७०९ धावा केल्या आहेत. परंतु, तो शतक करू शकलेला नाही.

First Published on: June 25, 2021 2:45 PM
Exit mobile version