कोहली जराही सुधारलेला नाही ! – मिचेल जॉन्सनची टीका

कोहली जराही सुधारलेला नाही ! – मिचेल जॉन्सनची टीका

मिचेल जॉन्सन-विराट कोहली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यात बऱ्याचदा शाब्दिक चकमक झाली. या दरम्यान कोहली पेनला ‘मी जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि तू फक्त काही दिवसांसाठी कर्णधार आहेस’ असे म्हणाला असा दावा ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी केला होता. कोहलीने ही मालिका सुरु होण्याआधी आपण या मालिकेत वादविवाद करणार नाही असे म्हटले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीत झालेल्या वादविवादामुळे कोहली जराही सुधारलेला नाही अशी टीका ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मिचेल जॉन्सनने भारतीय कर्णधारावर केली आहे.

कोहलीचे वागणे खूपच अपमानजनक  

जॉन्सन कोहलीविषयी म्हणाला, “कोहली ही मालिका सुरु होण्यापूर्वी मी आता बदललो आहे आणि या मालिकेत वादविवाद करणार नाही असे म्हणाला होता. पण पर्थ कसोटीत तो ज्याप्रकारे वागला त्यावरून तो जराही सुधारलेला नाही हे स्पष्टपणे दिसले. सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धीशी तुम्ही वादविवाद जरी केलात तरी सामना संपल्यावर तुम्ही तो वाद विसरून प्रतिस्पर्धीचा आदर करणे महत्वाचे असते. पण पर्थ कसोटी संपल्यावर कोहलीने पेनशी नीट हातही नाही मिळवला, जे माझ्यामते खूपच अपमानजनक होते. कोहली असा उद्धटपणे वागतो आणि त्याच्यावर टीकाही होत नाही, कारण तो विराट कोहली आहे. मात्र या सामन्यानंतर तो खूपच मूर्ख दिसला.”

२०१४ मध्ये जॉन्सन-कोहलीमध्ये वाद झाला होता 

जॉन्सनने कोहलीवर टीका केली यात काही नवल नाही. कारण, भारताच्या २०१४ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात जॉन्सन आणि कोहलीमध्ये चांगलाच वाद झाला होता. त्यावेळी जॉन्सन कोहलीला ‘बिघडलेला, वाया गेलेला मुलगा’ असे म्हणाला होता. त्या वादाबद्दल जॉन्सन म्हणाला, “सामना संपल्यावर कोहली मला येऊन म्हणाला होता की त्याच्याकडे माझा आदर करण्याचे काहीही कारण नाही, जे खूपच अपमानजनक होते.”
First Published on: December 20, 2018 2:30 AM
Exit mobile version