वनडेत विराट कोहली सर्वोत्तम – स्टिव्ह स्मिथ

वनडेत विराट कोहली सर्वोत्तम – स्टिव्ह स्मिथ

विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ   

भारताचा विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम दोन फलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोघांमध्ये सतत तुलना होत असते. अनेकांच्या मते स्मिथ हा कसोटीतील सर्वोत्तम फलंदाज आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये मात्र कोहली उजवा ठरतो. आता स्वतः स्मिथनेच कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून संबोधले आहे.

जगातील सर्वोत्तम फलंदाज कोण?

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून शुक्रवारपासून त्यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र, त्याआधी स्मिथने थोडा वेळ काढत इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. यात एका चाहत्याने ‘तुला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज कोण वाटतो?,’ असे स्मिथला विचारले. याचे उत्तर त्याने विराट कोहलीचे नाव घेतले.

पीटरसननेही केले होते कौतुक  

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहलीचा (४३) दुसरा क्रमांक लागतो. तसेच त्याने आतापर्यंत तब्बल ५९.३४ च्या सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच केविन पीटरसननेही कोहलीचे कौतुक केले होते. ‘तो सातत्याने भारताला सामने जिंकवून देतो आणि हीच त्याची खास गोष्ट आहे,’ असे पीटरसन म्हणाला होता.

First Published on: September 10, 2020 9:24 PM
Exit mobile version