कसोटीत कोहली अव्वल स्थानी कायम

कसोटीत कोहली अव्वल स्थानी कायम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कोहलीने १३९ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याने आपल्या खात्यात गुणांची भर घातली आहे. तसेच विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक झळकावणाऱ्या रविंद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

कोहलीच्या खात्यात ९३६ गुण   

कर्णधार विराट कोहलीने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने या मालिकेच्या ५ सामन्यांत ५९.३० च्या सरासरीने ५९३ धावा केल्या होत्या. ज्यात २ शतकांचा समावेश होता. तर त्याने आपले सातत्यपूर्ण प्रदर्शन सुरू ठेवत वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही शतक केले. त्यामुळे कोहलीने कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान अधिकच भक्कम केले आहे. त्याच्या खात्यात सध्या ९३६ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ ९१९ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या केन विल्यमसनच्या खात्यात ८४७ गुण आहेत. तर भारताचा चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानी कायम आहे.

जडेजाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी

दुसरीकडे रविंद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात ४२० गुण आहेत. त्याने विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत केलेल्या शतकाचा त्याला फायदा झाला आहे. जडेजा पहिल्या स्थानी असलेल्या शाकिब उल हसनपासून फक्त ३ गुणांनी मागे आहे. तर जडेजा गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. त्याच्या खात्यात ८१८ गुण आहेत. भारताचा दुसरा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन ७७९ गुणांसह आठव्या स्थानी आहे.
First Published on: October 12, 2018 10:51 PM
Exit mobile version