विराट कोहली दुसर्‍या खेळाडूचे नेतृत्व सहन करू शकणार नाही!

विराट कोहली दुसर्‍या खेळाडूचे नेतृत्व सहन करू शकणार नाही!

नासिर हुसेनचे मत

विराट कोहलीसारखा आक्रमक वृत्तीचा व्यक्ती दुसर्‍या खेळाडूचे नेतृत्व बहुदा सहन करू शकणार नाही. त्यामुळे पुढेही त्यानेच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले पाहिजे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले. विराट सध्या भारत, तसेच आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कर्णधारपद भूषवतो. त्यामुळे त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे रोहित शर्माने नेतृत्व केले पाहिजे असे काहींना वाटते. मात्र, विराट या मताशी सहमत असेल असे हुसेन यांना वाटत नाही.

खेळाडूचे व्यक्तिमत्व कसे आहे यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. विराटचा इतरांवर खूप प्रभाव आहे, तसेच तो आक्रमक वृत्तीचा आहे. तो दुसर्‍या खेळाडूचे नेतृत्व बहुदा सहन करु शकणार नाही. त्यामुळे भारताने पुढेही सर्व अधिकार त्यालाच दिले पाहिजेत. दुसरीकडे इंग्लंडच्या कसोटी संघाचे जो रुट, तर मर्यादित षटकांच्या संघाचे इयॉन मॉर्गन नेतृत्व करतो. हे दोघेही शांत आणि संयमी आहेत. ते फारसा विचार करत नाहीत, असे हुसेन म्हणाला.

दोन वेगवेगळ्या कर्णधारांऐवजी भारताने दोन वेगवेगळे प्रशिक्षक निवडण्याबाबत विचार केला पाहिजे असे हुसेनला वाटते. प्रशिक्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. दोन वेगवेगळे प्रशिक्षक असल्यास तुम्हाला नव्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कल्पना असतात. त्यामुळे दोन प्रशिक्षक नेमणे फायद्याचे ठरू शकते. तसेच भारताने संघ निवडीत सुधारणा केली पाहिजे, असे हुसेनने नमूद केले.

First Published on: May 14, 2020 5:25 AM
Exit mobile version