ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीला शतक करू देणार नाही-पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीला शतक करू देणार नाही-पॅट कमिन्स

पॅट कमिन्स आणि विराट कोहली

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अजून जवळपास चार महिने दूर आहे. मात्र कांगारूंनी आतापासूनच या दौऱ्यासाठी तयारी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सिडनीत ‘चॅनल ७’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, भारतीय कर्णधार विराट कोहली संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकही शतक झळकावू शकणार नाही. त्याने केलेले हे भाकित सध्या सर्वत्र वायरल होताना दिसत आहे.

नक्की काय बोलला कमिन्स

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सिडनीतील ‘चॅनल ७’ या वृत्तवाहिनीवरील एका शोमध्ये एक भाकित केले आहे. “भारताचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकही शतक करू शकणार नाही आणि आम्ही भारतीय संघांचा दारूण पराभव करू” असे भाकित कमिन्सने केले.

पॅट कमिन्स

आयपीएल २०१८ मध्ये दुखापतीमुळे कमिन्स आयपीएल खेळू शकला नाही, २०१७ मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स कडून खेळत होता. याआधीही कमिन्सने विराटवर बरीच वक्तव्ये केली आहेत. २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात खराब कामगिरी केल्यामुळे कोहलीला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा दबाव होता. मात्र तरी विराटने अप्रतिम खेळ करत आठ डावांमध्ये ६९२ धावा केल्या होत्या. ज्यात चार शतकांचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे त्यावेळी पहिले दोन सामने धोनी दुखापतीमुळे बाहेर होता त्यामुळे संघांचे कर्णधारपद सांभाळत विराटने अप्रतिम खेळी केली होती. विराट नेहमीच ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना उत्कृष्ट कामगिरी करताना आपल्याला दिसून आला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल केलेल्या या भाकिताचा काय परिणाम होईल हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

असा असेल भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया दौरा

नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ज्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. २१, २३ आणि २५ नोव्हेंबरला टी-२० सामने होणार आहेत. तर ६ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान ४ कसोटी सामने खेळवले जातील आणि शेवटी १२, १५ आणि १८ जानेवारी रोजी तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील.

ऑस्ट्रेलिया वि. भारत
First Published on: July 11, 2018 8:46 PM
Exit mobile version