विराटचा स्टायलिश नवा लूक

विराटचा स्टायलिश नवा लूक

विराट कोहली

इंग्लंडच्या विरुद्ध तिसरी टेस्ट मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या कॅप्टन विराट कोहलीनं आपला लूक बदलण्याचा विचार केला असावा. विराट आता नव्या स्टायलिश लूकमध्ये समोर आला आहे. विराट नेहमीच आपल्या केसांबरोबर वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. कोहलीनं नुकताच ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आलिम हकीमबरोबर विराट दिसत आहे. विराटनं नवा लूक आपल्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.

कोहली नेहमीच वेगळ्या लुकमध्ये 

वास्तविक याबाबतीत कोहलीनं संकेतही दिला आहे. त्यानं ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये,’मुलांबरोबर एक दिवस’ अशी कॅप्शन दिली आहे. यापूर्वीही आयपीएल २०१८ च्या आधी आलिम हकीमकडूनच विराटनं आपली हेअरस्टाईल करून घेतली होती. तर या नव्या लुकमध्ये विराटनं आपले केस अगदी छोटे करून घेतले आहेत. सध्या अशी हेअरस्टाईल तरूणाईमध्ये प्रसिद्ध आहे. दरम्यान बॉलीवूड आणि क्रिकेटर्समध्ये आलिम हकीम हेअरस्टाईल्ससाठी ओळखला जातो.

टॅटूचा चाहता

विराटला टॅटूचंही वेड आहे. त्याच्या शरीरावर सध्या ९ टॅटू आहेत. यामध्ये डाव्या हातावर मॉनेस्ट्री अर्थात शांतता आणि शक्तीचं प्रतीक असणारा टॅटू आहे. तर याच्या मागे मानसरोवराच्या काठी ध्यानस्थ भगवान शिवचा टॅटू त्यानं काढला आहे. शिवाय जपानी समुराय योद्धाचा एक टॅटू असून त्याच्या मागच्या बाजूला आपल्या आई – वडिलांचं नाव विराटनं हिंदीमध्ये गोंदवून घेतलं आहे. इतकंच नाही तर आपल्या टेस्ट आणि वनडे मॅचमधील क्रमांकदेखील त्यानं डाव्या बाजूला गोंदवून घेतला आहे. विराटचं टॅटू प्रेम सर्व जगालाच माहीत आहे. त्यामुळं विराट केवळ खेळातच नाही तर स्टाईल आयकॉन म्हणूनदेखील तरूणाई त्याच्याकडे नेहमीच पाहते. कदाचित म्हणूनच विराट नेहमी आपला लूक बदलत राहतो. विराटनं नुकतंच तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून पुन्हा एकदा टेस्टमध्ये आपला अव्वल क्रमांक पटकावला आहे. दरम्यान ३० ऑगस्टपासून चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.

First Published on: August 26, 2018 4:50 PM
Exit mobile version